दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहरातील वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येमुळे येथील कोविड सेंटर वरील ताण खूपच वाढत होता तसेच रोजच शहरातील बाधित रुग्ण वाढत असल्याने कोविड सेंटर्स ही फुल होण्याच्या मार्गावर येत असल्यामुळे शहरातील खाजगी दवाखाने येथील शासनाने ताब्यात घ्यावीत अशी मागणी दौंडकरांनी ‛सहकारनामा’ च्या माध्यमातून प्रशासनाकडे केली होती.
आता ही मागणी मान्य झाली असून दौंड करांची मागणी मान्य झाल्यामुळे येथील बाधित रुग्णांना दिलासा मिळाला आहे. शहरातील पिरॅमिड (सहकार चौक), योगेश्वरी (शालिमार चौक) तसेच दौंड गोपाळवाडी रोड वरील सरस्वती नगर येथील महालक्ष्मी दवाखान्यांचा यामध्ये समावेश आहे.
सद्य परिस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे या करिता जिल्ह्यातील खाजगी दवाखाने विलगीकरण करण्यासाठी पूर्णतः अथवा आवश्यकतेप्रमाणे खाटांची व्यवस्था, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे सेवे सहित आदिग्रहित करण्यात आली आहेत.करोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रोग प्रतिबंधात्मक कायदा१८९७ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी याबाबत असे सांगितले की, करोना बाधित रुग्णांमध्ये सौम्य आणि आणि गंभीर लक्षणे दिसत असतात या लक्षणांच्या मधल्या फळीतील (सेकंड स्टेज) रुग्णांना खाजगी दवाखान्या मध्ये उपचारासाठी भरती करण्यात येणार आहे.
त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची ची मदत मिळणार आहे तसेच खाजगी दवाखान्यात असणाऱ्या अतिदक्षता विभागाची सोय रुग्णांना मिळणार आहे, यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असणार आहे आणि मृत्युदर कमी होण्यास सुद्धा मदत होणार असल्याचे डॉक्टर डांगे यांनी सांगितले. खाजगी रुग्णालयातील उपचारासाठी बाधित रुग्णांकडून एक पैसाही घेतला जाणार नसल्याचेही ही त्यांनी सांगितले.