नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दुर्गादेवी जगदाळे मैदानात, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

राजकीय वार्तापत्र – अब्बास शेख

दौंड : पुणे जिल्ह्यात महत्वपूर्ण मानल्याजाणाऱ्या नगरपालिकांपैकी एक असलेल्या दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. दौंड शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते आणि नगरसेवक यांनी माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांची कन्या तसेच विरधवल जगदाळे यांची पुतणी दुर्गादेवी यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी पक्ष श्रेष्ठी यांच्याकडे केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे या आज सोमवार दि. १७ नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर कुल-कटारिया यांच्या गटाने अजूनही आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार गुलदस्त्यामध्ये ठेवला आहे.

दौंड नगराध्यक्षपद हे ओबीसी साठी राखीव असून दुर्गादेवी जगदाळे या कुणबी प्रमाणपत्रावरून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबतची पुष्टी दौंड राष्ट्रवादी शहराध्यक्ष गुरमुख नारंग यांनी ‘सहकारनामा’ सोबत बोलताना केली आहे. सध्या दौंड शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय घडामोडिंना चांगलाच वेग आला आहे. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे या निवडणुकीत जातीने लक्ष घालत असून प्रेमसुख कटारिया यांनी या ठिकाणी मोठी रणनीती आखली आहे. शहरातील राष्ट्रवादी चे दिग्गज असलेले माजी नगराध्यक्ष बादशहा शेख, माजी उपनगराध्यक्ष वसीम शेख, इस्माईल शेख तसेच नगरसेवक राजेश गायकवाड यांची कुल-कटारिया यांना साथ लाभल्याने आता या निवडणुकीची चुरस आणखीच वाढली आहे.

राष्ट्रवादीच्या समितीनेही कंबर कसली – वरील सर्व घडामोडी पाहता आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने या निवडणुकीत कंबर कसली असून माजी आमदार रमेश थोरात, विरधवल जगदाळे, शहराध्यक्ष गुरमुख नारंग, नंदू पवार, स्वप्निल शहा यांच्या समितीने दौंड शहरात आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. काहीही करुन नगराध्यक्षपद मिळावायचेच असा प्रण राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यातूनच उच्चशिक्षित दुर्गादेवी जगदाळे यांचे नाव पुढे आले आहे.

महायुती, महाविकास आघाडी की स्वबळावर होणार निवडणूक – प्रत्येक पक्षात इच्छुक वाढल्याने नेमकी कुणाला उमेदवारी द्यावी यावरून प्रत्येक पक्षातील पक्षश्रेष्ठी आणि इच्छुकांमध्ये तूतू मैमै होताना दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक पक्ष कार्यकर्ते ऐकला चलो रे अशी हाक देताना दिसत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी महायुती, महाआघाडी या सर्वांमध्ये बिघाडी होताना दिसत आहे.