दौंड : उत्तर प्रदेश राज्यामधून घर सोडून आलेल्या एका अल्पवयीन प्रेमी युगुलास रेल्वे तिकीट निरीक्षकाने(TC) लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केली असल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश राज्यातून एक अल्पवयीन जोडपे दोन -तीन दिवसापूर्वी आपले घर सोडून पुणे येथे आले होते. परंतु नंतर त्यांनी येथे राहण्याचा विचार सोडून पुन्हा आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला असावा म्हणून ते पुणे- लखनऊ एक्सप्रेस गाडीने पुण्याहून परतीच्या प्रवासाला निघाले. पुणे- दौंड दरम्यान येथील तिकीट निरीक्षक हनुमंत वाघ यांनी त्यांना तिकिटाविषयी विचारले, त्यांना थोडा संशय आल्याने त्यांनी त्यांच्याविषयी सुद्धा विचारणा केली. सुरुवातीला या जोडप्याने आम्ही दोघे भाऊ- बहीण आहोत असे सांगितले परंतु अधिक चौकशी केली असता त्यांनी आम्ही मित्र आहोत लग्न करण्याच्या इराद्याने घर सोडले असल्याचे कबूल केले.
प्रवासादरम्यान या दोघांचे काही बरेवाईट होऊ नये किंवा त्यांनी स्वतः आपले काही वाईट करून घेऊ नये या माणुसकीच्या भावनेतून आपल्या तिकीट निरीक्षकांनी या जोडप्याला दौंड लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. लोहमार्ग पोलिसांनी या दोघांच्या पालकांशी तत्काळ संपर्क साधला असून त्यांचे आई-वडील यांना घेण्यासाठी दौंडला रवाना झाले आहेत.
तिकीट निरीक्षक हनुमंत वाघ यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे आज उत्तर प्रदेश मधील दोन अल्पवयीन मुले( मुलगा, मुलगी) लोहमार्ग पोलिसांकडे सही सलामत आहेत. या कामी मंडल मुख्य तिकीट निरीक्षक राजगोंड, मुख्य तिकीट निरीक्षक तरटे, लोहमार्ग पोलीस प्रशांत नेवरे, रेल्वे सुरक्षा बल पो.कर्मचारी तडवी, दुर्गा चरण महतो, शंकर व्हकाडे, संदीप शेलार यांचे सहकार्य लाभले.