चार दिवस सासूचे असतात, परंतु चार दिवस सुनेचे सुद्धा येतात हे विसरू नका : अजितदादा पवार

अख्तर काझी

दौंड शहर : सरकार येत असते जात असते, सगळेच जण त्याच ठिकाणी राहतात असे नाही. जसे चार दिवस सासूचे असतात तसेच चार दिवस सुनेचे सुद्धा येतात त्यामुळे आपण कधीही सत्ता असली म्हणून मस्ती दाखवू नये आणि सत्ता नसली तरी ना उमेद होऊ नये असा ईशारा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दौंड येथील सभेत दिला. नव्याने पक्षात आलेल्या स्वप्निल शहा व इतर सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस मान सन्मानाची वागणूक देणार आहे. आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो अशी वेळ माझ्यासहित कोणीही तुमच्यावर येऊ देणार नाही हा शब्द मी देतो असेही अजितदादा बोलताना म्हणाले. या कार्यक्रमात रमेश थोरात, विरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, स्वप्निल शहा, नंदू पवार यांसह अन्य मान्यवरांनी आपापली मते व्यक्त केली.

दौंड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या जाहीर प्रवेश व संवाद मेळावा या कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार रमेश थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, गुरुमुख नारंग, महेश भागवत तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी दौंड शहराध्यक्ष स्वप्निल शहा, मा. ज्येष्ठ नगरसेवक नंदू पवार, मनोज फडतरे व इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आपल्या भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले की, दौंड एक महत्त्वाचे जंक्शन आहे, संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताला जोडणारे जंक्शन आहे. दौंडला मिनी भारत म्हणूनही ओळखले जाते. अनेक जाती-धर्माची लोक येथे गुण्या गोविंदाने राहतात. व्यापारी देखील कष्टाने व्यापार करतात, नवीन पिढी व्यापारात आलेली आहे. येथे रेल्वेचे चांगले साधन आहे, तसेच शहराला जोडणारे रस्ते चांगले झालेले आहेत. त्यामुळे सगळ्याचा विचार केला तर या शहरामध्ये बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. बारामती बाजारपेठ बारा महिने चालते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्ही त्या ठिकाणी शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत. दीड लाख विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. म्हणून बारामती बदलत चालली आहे.

काही लोकांकडून म्हटले जाते की बारामतीचा विकास व इतर शहरे भकास मात्र असे बिलकुल नाही मी सर्वांना मदत करतो, शहराला झालेल्या मदतीमधील पैशाचा योग्य रित्या खर्च झाला पाहिजे तरच शहराचा विकास होतो. सकाळी सहा वाजल्यापासून उठून काम करावे लागते, लोकांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात, काम करताना सर्वांना बरोबर घेऊन कामे करावी लागतात, त्या ठिकाणी दुजाभाव करून चालत नाही म्हणून शहराचा विकास दिसतो. दौंड तालुक्यातील अनेक रस्त्यांना मी निधी दिलेला आहे. पी. एम .आर .डी .खात्याचा निधी सुद्धा दौंड तालुक्याला आलेला आहे. अष्टविनायक गणपती साठी जवळपास दीडशे कोटी रुपये आपण खर्च करत आहोत. योग्य कामाला योग्य ठिकाणी पैसे देण्याची आमची तयारी असते.

बारामती आणि दौंड वेगळी शहरे नव्हती, आम्ही तालुक्यात शैक्षणिक संस्था काढल्या. शहरात जर कोणाला काही नवीन सुरू करावयाचे असेल तर मी राजकारण मध्ये न आणता त्यांना मदत केली. निवडणुकीच्या वेळेस राजकारण आपण करू परंतु एकदा का निवडणूक झाल्या की नंतर खऱ्या अर्थाने त्या भागातील जनतेचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्या ठिकाणी रोजगार कसा निर्माण होईल, बाजारपेठेत उठाव कसा येईल, बाजारपेठेत चलन कसे फिरेल या गोष्टी बघावयाच्या असतात. केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना आहेत त्या योजना आणून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे लागते तरच शहराचा विकास दिसेल असेही अजित पवार म्हणाले.

आपण सगळ्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे बेरजेचे राजकारण पाहिले आहे. आपण नेहमी शिव- शाहू -फुले -आंबेडकरांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून पुरोगामी विचार पुढे घेऊन जात असतो. सगळ्या राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवून आम्ही राजकारणाला सुरुवात केली आहे. कधीही जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही. जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती व 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा इतिहास घडविला आहे. त्यांचा आदर्श ठेवून आपले कामकाज केले पाहिजे.

दौंड शहरातील पोलीस प्रशासना विषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, बाबासाहेबांच्या संविधानाचा, घटनेचा आदर करून पोलिसांनी काम करावे. निरपराध लोकांना त्रास देऊ नये, फार काळ ते सहन केले जात नाही हे पोलीस प्रशासनाने ध्यानात घ्यावे. कार्यक्रमाचे औचित्य साधित, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वप्निल शहा यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1लाख 55 हजार 555 रुपयांचा धनादेश अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.