मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी काल युती सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून या सरकारमध्ये सामिल झालो आहोत असे अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी असे मागणीचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे.
अजित पवारांसह नऊ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे या पत्राद्वारे करण्यात आली असून याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. पक्षाच्या ध्येय धोरणाविरुद्ध जाऊन पक्षाविरुद्ध पाऊल उचल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र देण्यात आल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय. अजित पवारांसह इतर आमदारांनी शरद पवार यांना कोणतीही कल्पना न देता पक्षाच्या धोरणाच्या विरोधी जाऊन शपथ घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी पुढे म्हटले आहे.
आमदार परत आले नाहीत तर नाईलाजाने कारवाई – जितेंद्र आव्हाड पक्षाचा व्हिप सर्वांना लागू असेल. त्यामुळे गेलेले आमदार परत आले नाही तर नाईलाजाने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तर 5 जुलैला सर्वांना समजेल की किती आमदार शरद पवारांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.