दौंड : केडगाव ता. दौंड येथील नागेश्वर विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान संचालक मोहन शेळके यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार रमेश थोरात गटाचे कट्टर समर्थक तानाजी शेळके तसेच इतर कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
मोहन शेळके तसेच तानाजी शेळके हे माजी आमदार रमेश थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांनी आमदार राहुल कुल गटात प्रवेश केल्याने केडगावमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांची नेमकी नाराजी काय असावी याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या राष्ट्रवादीतील अनेक जुने कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीच्या थोरात गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नागेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमध्ये नुकतीच संपत शेळके यांची चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर मोहन शेळके आणि अन्य लोकांनी थोरात गटातून कुल गटात प्रवेश केल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. तर विविध संस्थांच्या निवड प्रक्रिया पार पडत असताना मोजक्याच लोकांना विचारात घेतले जाते अन्य लोकांना विचारात घेतले जात त्यामुळे नाराज होऊन अनेकजण पक्ष सोडून जात असल्याचे कार्यकर्त्यांच्या चर्चेतून पुढे येत आहे.