आज दीड दिवसांच्या ‘श्रीं’ चे भक्तिभावाने विसर्जन, लहानथोरांनी दिला भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

सुधीर गोखले

सांगली : ‘गणपती बाप्पा मोरया’, मंगलमूर्ती मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गणेश  भक्तांच्या घोषणांनी नदी परिसरातील वातावरण भक्तिमय झाले. आज परंपरागत दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी मिरजेतील कृष्णाघाट परिसर गणेश भक्तांनी फुलून गेला. 

आज तासगाव संस्थानच्या रथोत्सवाबरोबर संस्थानच्या ‘श्रीं’ चे विसर्जन आहे तर काही घरगुती श्रींच्या मूर्तींचे आज विसर्जन कृष्णाघाट परिसरात होणार आहे.  महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी जय्यत तयारी केली आहे. पुरेशी विद्युत व्यवस्था, जनरेटर इ.  विशेष करून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने विशेष खबरदारी म्हणून बोटींसंह आपली यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे तर निर्माल्य टाकण्यासाठी वेगळी सोयही केली आहे.

महापालिका उपायुक्त स्मृती पाटील या सर्व व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेऊन आहेत,  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महात्मा गांधी चौक पोलिसांनी याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. 
वारणा धरण १०० टक्के भरले
बळीराजाला सुखावणारी बातमी म्हणजे बाप्पाच्या आगमनाबरोबरच वारणा धरणही १०० टक्के भरले असून कोणत्याही क्षणी या धरणातून विसर्ग होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे सांगलीमध्ये सध्या पाण्याअभावी कृष्णा नदीपात्र कोरडे पडले होते त्यामुळे श्री गणेश विसर्जन कसे होणार? असा प्रश्न    महापालिका प्रशासनाला पडला होता.

मात्र वारणा धरण भरल्याने सांडव्यातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात कृष्णानदी पात्रात पाण्याची पातळी श्री गणेश मूर्तींचे विसर्जन होण्याइतपत वाढेल अशी खात्री आता प्रशासनाला आहे.