सामाजिक सलोखा जपण्याची शहराची परंपरा दौंडकरांनी अबाधित ठेवावी – उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांचे आवाहन

दौंड : दौंड शहरात सर्वच समाजाचे सण, उत्सव दौंडकर एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात व शहरातील भाईचारा, जातीय सलोखा अबाधित ठेवतात अशी या शहराची परंपरा आहे आणि हीच परंपरा दौंडकरांनी कायम ठेवून दहीहंडी, गणेशोत्सव व पैगंबर जयंती उत्सव साजरे करावेत असे आवाहन दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी केले.

या तिन्ही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस प्रशासनाने शांतता कमिटी बैठकीचे आयोजन केले होते यावेळी जाधव बोलत होते. या बैठकीला पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहा. पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले, महावितरणचे अभियंता बशीर देसाई तसेच विविध समाजाचे मंडळांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

स्वप्निल जाधव म्हणाले, मागील पाच ते दहा वर्षांमध्ये दौंड शहर व तालुक्यामध्ये गणेशोत्सवा दरम्यान कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही याबद्दल सर्वप्रथम दौंडकारांचे अभिनंदन. शहरामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत असताना एकही गुन्हा दाखल न होणे ही खूपच अभिमानाची बाब आहे, आणि आपले हेच रेकॉर्ड येथून पुढेही ठेवायचे आहे. गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येक मंडळांनी पोलीस प्रशासन व नगरपालिकेची परवानगी घ्यावी जेणेकरून काही प्रकार झाला तर पोलीस प्रशासनाला मंडळांना मदत करणे सोपे जाईल.

प्रत्येक मंडळांनी महावितरण वीज कंपनीकडून अधिकृत वीज जोड घ्यावे, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची नावे पोलिसांकडे द्या म्हणजे त्यांच्याशी संवाद करणे पोलीस प्रशासनाला सोपे जाईल. प्रत्येक मंडळाला पोलीस प्रशासनाकडून एक पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यामुळे मंडळांच्या अडचणी जाणून घेण्यास मदत होईल व त्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यामुळे होणार आहे. समाजामध्ये चांगले संदेश जातील असे देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर द्यावा. देखावे पाहण्यासाठी महिला ,लहान मुले, भाविक येत असतात त्यांचे दर्शन सुसह्य होण्यासाठी मंडळांनी आपले स्वयंसेवक नेमावेत जेणेकरून भाविकांना कुठलीही अडचण येणार नाही.

उत्सवा दरम्यान मंडळांनी विधायक उपक्रम राबवावेत.त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी आपले मंडप रस्त्यावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी, मंडप रस्त्यावर आल्यास त्या परिसरात वाहतूक कोंडी होते व अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वाद होतात ते वाद आपल्याला टाळावयाचे आहेत. मंडळांच्या कार्यकर्त्यांशी जर कोणाचे वाद होत असतील तर तुम्ही वाद न करता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावयाचा आहे, संबंधितांवर पोलीस नक्कीच कारवाई करणार आहे. गणपतीची वर्गणी मागताना कोणालाही बळजबरी करू नका.

गणेशोत्सवामध्ये सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करावा, या दिवसांमध्ये भावना दुखावणारी एखादी पोस्ट जर कोणाकडून आली तर ती कोणालाही पुढे पाठवू नका. त्याची माहिती पोलिसांना कळवा अशा व्यक्तींवर निश्चितपणे कारवाई होईल. शहरातील पारंपारिक मार्गावरून गणेश विसर्जनाची मिरवणूक शांततेने काढावयाची आहे, मिरवणूक उत्साहाने होईल याची आम्हाला खात्री आहे. मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्याचा वापर करा, डीजे चा वापर पूर्णपणे टाळाच. गणेशोत्सव सर्वांचाच आहे तो साजरा करताना किंवा विसर्जन मिरवणुकीमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी गाणी वाजवू नका, देशभक्तीपर गीते तसेच भक्ती संगीत वाजविण्यावर भर द्यावा. सर्व समाजामध्ये सलोखा असणारी आपली परंपरा आपल्याला राखायची आहे असेही स्वप्निल जाधव म्हणाले.

उत्सव साजरा करताना उत्सवाला कोठेही गालबोट लागू नये व सर्वांना या उत्सवांचा आनंद घेता यावा व त्यासाठी मंडळांनी , कार्यकर्त्यांनी नेमके काय केले पाहिजे व कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले. पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार मानले.