Daund : दौंडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आक्रोश आंदोलन



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दौंड शहर व तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण स्थगिती निषेधार्थ व मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. 

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस कार्यालय, चौफुला येथील शिवसेना कार्यालय तसेच राहू येथील भाजपा आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी आक्रोश आंदोलन करण्यात आले व यावेळी संबंधितांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा ही देण्यात आला आहे.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने SEBC मराठा आरक्षणाचा विषय घटना पिठा कडे सुपूर्त करताना जो स्थगिती आदेश दिला आहे त्यामुळे मा मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्या प्रमाणे घटना व कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घेऊन सदरची स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर बाब अवलंबित करावी व मराठा आरक्षण खंडित होऊ न देता पूर्ववत चालू ठेवावे. या प्रमुख मागणीसह इतर मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या  आहेत. 

अत्यंत कष्टाने मिळालेले आरक्षण हे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवू शकले नाही याबाबत मराठा समाजात संतप्त भावना आहेत, आणि याच्या तीव्र प्रतिक्रिया संपूर्ण राज्यात उमटत आहेत. 

मराठा समाजाला एकही दिवस आरक्षणापासून वंचित ठेवले जावु नये. जर आमच्या मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही तर समाजाला तीव्र आंदोलन करावे लागेल याची शासनाने दखल घ्यावी अशी विनंती सुद्धा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आक्रोश आंदोलनावेळी मराठा समाजातील सर्व क्षेत्रातील पदाधिकारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.