दौंड : सहकारनामा ऑनलाईन
मळद येथील पुणे सोलापूर महामार्ग व रेल्वे स्टेशन दरम्यानच्या रस्त्याच्या मुरमी करणाच्या कामास आमदार राहुल कुल यांच्या आमदार फंडातून 3 लाख रुपये तरतूद करण्यात आली होती. तसेच या कामाचे टेंडर ही झाले होते.
सदरचा रस्ता हा भोळबावाडी, कौठडी, मळद शेलार वस्ती, तसेच मळद ग्रामस्थांनी च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्याचा वापर मळद रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा आहे. सन 1965 पासून हा रस्ता अस्तित्वात असून नकाशामध्ये या रस्त्याची नोंद आहे. मात्र या रस्त्याच्या कामात काही अडथळे निर्माण केले जात होते. याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधितांशी चर्चा ही झाली होती. तरीही रस्ता करण्यासाठी मज्जाव होत होता.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरिश्चंद्र माळशिकारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ह्या रस्त्याचे काम पुर्ण करुन घेतल्याने अनेक ग्रामस्थ, शेतकरी वर्गाची अडचण कायमची दूर झाली.
हा रस्ता झाल्याने मळद येथील ग्रामस्थांची मोठी अडचण दूर झाली त्यामुळे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार पत्र व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरिश्चंद्र माळशिकारे यांना ही आभार पत्र देवुन त्यांचा सत्कार ग्रामस्थांकडून करण्यात आला.नागरिकांची सोय झाल्याने, नागरिकांनी सत्कार केल्याने या सत्कारानंतर उप अभियंता माळशिकारे यांना गहिवरून आले.
दरम्यान तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असताना मळद येथील या रस्त्याचे काम पुर्ण केल्याबद्दल आमदार कुल व उप अभियंता यांचे आभार मानण्याची ही पहिलीच वेळ आहे.
विकासकामांना राजकीय वळण देवून अनेकदा जाणीवपूर्वक अडथळे निर्माण होतात परंतु अधिकारी वर्ग सक्षम असेल तर विकासकामांना गती मिळू शकते अशी सर्वसामान्य जनतेची यामुळे भावना झाली आहे. या कार्यक्षम अधिकाऱ्यांचे सर्वच स्थरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. दौंडचे आमदार राहुल दादा कुल यांनी याकामी विशेष लक्ष दिले. तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या या सत्कारामुळे शासकीय अधिकारी वर्ग देखील आचंबित झाला आहे.