Daund : नगरपालिका चालविणाऱ्या ठेकेदारांना वठणीवर आणण्याचे काम शिवसेना करणार, नगरपालिका व ठेकेदार विरोधात शिवसेनेचा दौंडमध्ये जागरण गोंधळ



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दौंड नगरपालिका जर ठेकेदार चालवीत असतील व  त्यामुळे सामान्य दौंडकर नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असेल तर या  मुजोर ठेकेदारांना वठणीवर आणण्याचे काम  शिवसैनिक करतील असा इशारा शिवसेनेचे दौंड विधान सभा नेते अनिल सोनवणे यांनी दिला आहे.

येत्या 15 दिवसात नगरपालिका प्रशासन व त्यांचे ठेकेदार यांनी आपली कार्यपद्धती बदलली नाही तर शिवसेना ठेकेदार ठोको आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले आहे.

शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य असून, अनेक प्रभागांमध्ये ठेवलेली अर्धवट कामे, ठेकेदारांचा मनमानी कारभार, विस्कळीत पाणीपुरवठा तसेच मोकाट जनावरांचा नागरिकांना होणारा त्रास या शहरातील झालेल्या सर्व परिस्थिती विरोधात आज दि. 16 डिसेंबर रोजी शिवसेनेने नगरपालिका कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन केले. या वेळी अनिल सोनवणे यांनी हा गर्भित इशारा दिला. या आंदोलनावेळी नगरपालिका प्रशासन, ठेकेदार व पैसे खाऊन ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्यांचा धिक्कार करण्यात आला. 

पक्षाचे पदाधिकारी संतोष जगताप, कैलास शहा, नामदेव राहिंज, रुपेश बंड, अमोल जगताप, शैलेश पिल्ले, रोहन घोरपडे, विक्रम इंगवले, संदीप बारटक्के, संजय पठारे, तसेच नगरसेविका अनिता दळवी, हेमलता परदेशी हे उपस्थित होते.

अनिल सोनवणे म्हणाले की, शहराची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे, शहरातील कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत,  या ठेकेदारांवर कोणाचाच अंकुश राहिलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य दौंडकर भरडला जात आहे. मुख्याधिकारी जर कबूल करत असेल की नगरपालिका ठेकेदार चालवीत आहेत तर दौंडकरांचे यापेक्षा कोणतेच मोठे दुर्दैव नाही. 

संपूर्ण शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत असतानाही नालायक प्रशासन दौंड करांना पाणी पाजताना अपयशी ठरत आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक नगरपालिकेमध्ये  नक्की करतात तरी काय हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो आहे. सर्व नगरसेवक असून नसल्या सारखे झाले आहेत, नगरसेवकांचे येथे कोण ऐकत नाही.

ही सर्व परिस्थिती बदलली नाही ही तर आज  रस्त्यावर आंदोलन केले आहे, उद्याच्या काळात गटारीचा गाळ, शहरात साचलेला कचरा कुठल्याही  क्षणी, कोणताही इशारा न देता नगरपालिका कार्यालयाच्या पायरीपासून मुख्याधिकारी साहेबांच्या खुर्ची पर्यंत टाकण्यात येईल असा इशाराही यावेळी अनिल सोनवणे यांनी प्रशासनाला दिला आहे.