Daund : नगरपालिका आली शहरातील पथ विक्रेत्यांच्या मदतीला, पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची प्रभावी जनजागृती



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

कोरोना महामारी मुळे संपूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. मोठ्या उद्योजकां पासून हातावरील पोट असणाऱ्या लोकांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने सर्वांसाठीच आर्थिक मदतीच्या योजना जाहीर केल्या आहेत.

त्याच अनुषंगाने केंद्र सरकार नगरपालिकेच्या माध्यमातून पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना प्रत्येक शहरात राबवित आहे. शहरातील प्रत्येक पथ विक्रेत्याला या  योजनेचा लाभ मिळावा व त्याच्या व्यवसायाची  गाडी पुन्हा व्यवस्थित रुळावर यावी या उद्देशाने दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर, नगराध्यक्ष शितल कटारिया व नगरसेवकांच्या पुढाकाराने या  योजनेची  शहरात प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. 

स्वतः मुख्याधिकारी राशिनकर यांनी पथ विक्रेत्यांना सदर योजनेची सविस्तर माहिती देत, माहिती  पत्रके वितरित केली. शहरातील जास्तीत जास्त पथ विक्रेत्यांनी  या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष कटारिया यांनी केले. नगरसेवक इंद्रजीत जगदाळे यांनी विक्रेत्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की या  योजनेत प्रत्येक विक्रेत्याला 10 हजार रुपये भाग भांडवल कर्ज रुपी मिळणार आहेत, या कर्जाची विक्रेत्याने नियमित फेड केल्यास बँक त्याला पुढील काळात अधिक रकमेचे कर्ज देऊ शकते. 

नगर पालिकेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील, नगर रचनाकार हर्षद घुले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक म्हस्के, बाजार विभाग प्रमुख नंदकुमार भोसले, तसेच रवींद्र भणगे, रोहन साळवे, नितीन तुपसौंदर्य,सागर सोनवणे प्रवीण खुडे आदिंनी जनजागृती मोहिमेचे  आयोजन केले. मोहिमेस विक्रेत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. शिवसेनेचे शहराध्यक्ष आनंद पळसे, कार्यकर्ते उपस्थित होते