दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आला, त्यामुळे हजारो लोकांचा रोजगार बुडाला, व्यवसाय बंद पडले. अशा परिस्थितीमध्ये महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स व इतर कंपन्यांकडून घेतलेले कर्ज व त्यांचे हप्ते भरणे त्यांना अशक्य झाले आहे.
केंद्र सरकारने मोठ्या उद्योग पतींचे हजारो कोटी रुपये कर्ज माफ केले आहे त्याच धरतीवर बेरोजगार झालेल्या महिला बचत गटातील महिलांचे सुद्धा कर्ज सरकारने माफ करावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने दौंड तहसील कार्यालयासमोर फायनान्स कंपनीच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे नमूद केले आहे की, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोणत्याही प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यांची वसुलीला स्थगिती दिली असताना पुणे विभागांमध्ये फायनान्स कंपन्यांकडून जबरदस्तीने व महिलांना अपमानास्पद वागणूक देत वसुली केली जात आहे. पैशासाठी महिलांकडे तगादा लावण्यात येत आहे. लॉक डाऊन मुळे महिलांचे रोजगार, व्यवसाय बंद पडल्यामुळे अनेक महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. पंढरपूर मधील 26 वर्षीय महिलेने तर मायक्रो फायनान्स कंपनीचा फक्त 500 रुपयाचा हप्ता भरू शकत नसल्याने आत्महत्या केली आहे. अशा संवेदनशील विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले असून फायनान्स कंपनीने महिला बचत गटांना दिलेले कर्ज सरकारने माफ करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे गोरक्ष बारवकर, अशोक होले, श्रीकांत ओहोळ, अमोल लोंढे, गोरख फुलारी, नानासाहेब चव्हाण, डॉ दत्तात्रय जगताप, निलेश बनकर तसेच महिला आघाडीच्या आशा चव्हाण, पुष्पा राणी बनकर, पल्लवी गाडे, माधुरी थोरात आदि उपस्थित होते.