केडगाव : दौंड तालुक्यातील आंबेगाव पुनर्वसन येथील जय भवानी पुनर्वसन शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यालयाने यावर्षीही कला संचालनालय मुंबई, आयोजित महाराष्ट्र राज्य शासकीय चित्रकला परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या इलेमेंटरी ग्रेड परीक्षेत या विद्यालयातील एकूण 17 विध्यार्थी आणि इंटरमेजिएट ग्रेड परीक्षेत 11 असे एकूण 28 विद्यार्थी या शासकीय चित्रकला परीक्षेत सहभागी झाले होते. यामध्ये कुमारी श्रावणी प्रमोद दळवी आणि कुमारी सानिका पांडुरंग कुंभार या दोन विद्यार्थ्यांनीना “B” ग्रेड दर्जा मिळाला तर इतर सर्व विद्यार्थ्यांना “C” ग्रेड दर्जा मिळून सर्व विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले. त्यामुळे या दोन्ही परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेल्या 25 वर्षाची परंपरा कायम राखून दरवर्षी आपल्या विद्यालयाचा शासकीय चित्रकला परीक्षा निकाल हा 100 टक्के ठेवण्यात यश मिळवले आहे. स्वामी विवेकानंद विद्यालय हे दौंड तालुक्यातील एकमेव पुनर्वसन चे विद्यालय असल्याची माहिती शिक्षकांनी दिली असून परीक्षा दरम्यान या विद्यालयात येणारे वाडी वस्तीवरील शेतकऱ्यांची मुले अतिशय कष्ट घेऊन सकाळी लवकर जादा तासासाठी विद्यालयात आवडीने उपस्थित राहतात त्यामुळे विद्यालयाचा दरवर्षी 100 % टक्के निकाल लागत असतो असे कलाशिक्षक हेमंत केंजळे सर यांनी सांगितले आहे.
विद्यालयाचा निकाल दरवर्षीप्रमाणे 100% लागल्याने संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर (माऊली) महाराज काळभोर, सचिव सुभाष निढाळकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा जाधव मॅडम तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुलांचे व कलाशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.







