दौंडच्या मुख्य बाजारपेठेतील कापड दुकानातून चोरट्यांनी लांबविले 1 लाख रुपये, चोरटे दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद

दौंड : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौकातील कापड दुकानातून चोरट्यांनी 1 लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी विलास स्टोअर्स दुकानाचे व्यवस्थापक पांडुरंग धोंडीबा गुंड यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यां विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 5.30 वा. दरम्यान येथील शिवाजी चौकातील विलास स्टोअर्स या कापड दुकानामध्ये दोन अज्ञात व्यक्ती खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या. त्यापैकी एकाने फिर्यादी यांच्याकडे सॉक्स( मोजे) दाखविण्याची मागणी केली, तर त्याचा दुसरा साथीदार याने दुकानात असणाऱ्या दुसऱ्या नोकराकडे अंडरवेअर ची मागणी केली, ती पाहण्याचा बहाणा करीत नोकराला त्यामध्ये गुंतवून ठेवले. फिर्यादी यांच्याशी इंग्रजीमध्ये बोलून त्याने वेगळी छाप पाडून विश्वास संपादन केला, दरम्यान फिर्यादी यांनी आरोपीने खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे घेतले, व उर्वरित पैसे परत देत असताना त्या आरोपीने आपल्याकडील पाकिटातील पैसे काउंटरवर टाकले. व दुकानाच्या गल्यातील 2 हजाराच्या,500 रु. च्या नोटा पाहण्याच्या बहाण्याने काऊंटरच्या आत मध्ये प्रवेश केला, व गल्यातील नोटा तपासू लागला. यावेळी त्याने हातचलाखीने गल्यातील रकमेपैकी 1 लाख 16 हजार 730 रु. चोरले. दोन्ही आरोपी दुकानातून बाहेर गेल्यानंतर गल्यातील पैसे चोरीला गेले असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. चोरीची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दौंड पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे. चोरट्यांनी दुकानदाराला संमोहित (हिप्नोटाइज) करून लुटले असावे अशा प्रतिक्रिया व्यापारी देत आहेत.