दौंड : कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण भारतातील रेल्वेसेवा बंद असल्याने दौंड रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या स्थानकाच्या दोन्ही बाजूकडील तिकीट खिडक्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर या बंद खिडक्या पैकी आरक्षण केंद्रात असलेली तिकीट खिडकी प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. मात्र शहरा कडील (रेल्वे दवाखाना) बाजूस असलेली तिकीट खिडकी आज पर्यंत बंदच ठेवण्यात आलेली होती.
हि तिकीट खिडकी बंद असल्याने याचा शहरातील प्रवाशांना प्रचंड त्रास होत होता. ह्या बाजूने आलेल्या प्रवाशांना तिकिटासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. तसेच एकच खिडकी चालू ठेवल्याने या ठिकाणी तिकिटासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत होती. या सर्व बाबी दौंड- पुणे- दौंड प्रवासी संघाने सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक प्रदीप हिरडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. प्रवासी संघाने याबाबत रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदन दिले होते.
या एकाच तिकिट खिडकीवर ताण पडत असल्याचे व येथील प्रवाशांच्या गर्दीचे फोटोहि रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आले होते. बंद असलेली तिकीट खिडकी पुन्हा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी संघाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून दि.21 जूनपासून शहराच्या बाजूची बंद असलेली तिकीट खिडकी पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्रदीप हिरडे यांनी प्रवासी संघाला दिली आहे.