काळेवाडी येथील गावठी दारू विक्री अड्ड्यावर दौंड पोलिसांची धाड, 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

दौंड : दौंड तालुक्यातील पूर्व भागातील काळेवाडी येथील गावठी दारू विक्री अड्ड्यावर दौंड पोलिसांनी धाड टाकून 54 हजारांचा( गावठी दारू व साहित्य) मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला आहे. सुभाष प्रल्हाद लोंढे (रा. ज्योतिबा नगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे.

दि.23 मे रोजी पो. निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पो. उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पो. क. अमोल देवकाते व सुभाष राऊत हे दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळगावराजे परिसरामध्ये गस्त करीत असताना बातमीदारामार्फत खबर मिळाली की काळेवाडी येथील ज्योतिबा नगर येथे गावठी दारू बनविली जात असून तिची बेकायदा विक्री होत आहे.

त्यामुळे पोलीस पथकाने ताबडतोब या ठिकाणी छापा मारला असता येथे पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम आपल्याकडील कॅन्डमध्ये दारू घेऊन बसलेला दिसला. पोलिसांची चाहूल लागताच तो पळाला. परंतु पोलिसांनी त्याला ओळखला व सुभाष लोंढे तू थांब असा आवाज देत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो निसटला. पोलीस पथकाने ठिकाणची तपासणी केली असता त्या ठिकाणी त्यांना 600 लिटर गावठी दारू व प्लास्टिकचे 50 लिटरचे बारा कॅन्ड सापडले.