बापरे… पोलिसच विकत होता बेकायदेशीर दारू | दौंड पोलिसांनी छापा मारून केली कारवाई

अख्तर काझी

दौंड : दौंड -गोपाळवाडी रोडवरील सरपंच वस्ती येथे चालविल्या जाणाऱ्या बेकायदेशीर दारू अड्ड्यावर दौंड पोलिसांनी छापा टाकून, विक्री होत असलेल्या देशी -विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करीत दारू अड्ड्याचा मालक शिवाजी संभाजी जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सेवानिवृत्त पोलीसच बेकायदेशीर दारू अड्ड्याचा मालक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दिनांक 12 मार्च रोजी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दौंड पोलीस स्टेशनला भेट दिली होती आणि शहरातील अवैध धंद्यांवर कडक कारवाईच्या सूचना त्यांनी केल्याने दौंड पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची कारवाई दि. 13 मार्च रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान सरपंच वस्ती परिसरात करण्यात आली. दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांना माहिती मिळाली की सरपंच वस्ती परिसरात बेकायदेशीर देशी -विदेशी दारू विक्रीचा अड्डा चालविला जात आहे.

खबर मिळताच घोडके यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना दिली. पवार यांनी तत्काळ कारवाईची सूचना केली. युवराज घोडके यांनी आपल्या पथकासह सदर ठिकाणी छापा मारला असता शिवाजी संभाजी जाधव (रा. सरपंच वस्ती दौंड) देशी-विदेशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री करीत असल्याचे दिसले. पोलीस पथकाने या अड्ड्यावरून दारूच्या बाटल्या व रोख रक्कम असा एकूण 15 हजार 60 रु. चा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाने, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस हवालदार विठ्ठल गायकवाड ,बापू रोटे, घाडगे, माने या पथकाने केली.