अख्तर काझी
दौंड : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला दौंड पोलिसांनी शहरातून पथसंचलन (रूट मार्च) केले. शहरातील हुतात्मा चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, खाटीक गल्ली, कुरेशी मोहल्ला, भाजी मंडई, कुंभार गल्ली, नेहरू चौक, गोवा गल्ली, शिवाजी चौक, सिद्धार्थ नगर ,पानसरे वस्ती ,शालिमार चौक, सरपंच वस्ती या मार्गावरून पथसंचलन करण्यात आले.
यावेळी दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, महेश आबनावे, 30 पोलीस कर्मचारी, 15 नव प्रविष्ट पोलीस कर्मचारी (सोलापूर ट्रेनिंग सेंटर), 30 राज्य राखीव पोलीस जवान, 10 होमगार्ड या पथ संचलनामध्ये सहभागी होते. गणेशोत्सव व पैगंबर जयंती उत्सवा दरम्यान शहरातील कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश यावेळी प्रशासनाने दिला.
गणेशोत्सव दरम्यान उत्सवाला कोणत्याही प्रकारे गालबोट न लागू देण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांची कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी करावी, कोणत्याही समाजाचे मन आपल्याकडून दुखावणार नाही याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी व उत्सवाचा आनंद सर्वांनाच घेता यावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे व गणेशोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.