अख्तर काझी
दौंड : हातामध्ये धारदार तलवार बाळगून दौंड मध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुंडास पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले आहे. गुरुदास निवृत्ती राऊत (रा. राघोबा नगर, गिरीम, दौंड) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली. दौंड पोलिसांच्या या कारवाईमुळे भाईगिरी करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या गुंडांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दि. 4 फेब्रुवारी रोजी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, गिरीम गावामध्ये गुरुदास राऊत हा धारदार तलवार बाळगून परिसरामध्ये दहशत निर्माण करत आहे. बातमी कळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तत्काळ पोलीस पथक पाठवून त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडील प्राणघातक तलवारही हस्तगत केली.
प्राणघातक शस्त्र बाळगून, नागरिकांमध्ये जर कोणी दहशत निर्माण करून येथील कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर नागरिकांनी तात्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी. अशाप्रकारे दहशत निर्माण करणाऱ्या कोणाही गुंडांची गय केली जाणार नाही असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.