अख्तर काझी
दौंड : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातून डंपर चोरून दौंड मार्गे जालना कडे निघालेल्या डंपर (ट्रक) चोराला दौंड पोलीस पथकाने येथील नगरमोरी चौक परिसरात डंपर सह जेरबंद केले आहे. सुरेश देविदास जगदाळे (रा. लालवाडी, ता. अंबड, जि. जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण कंट्रोल यांचेकडून दौंड पोलिसांना वायरलेस द्वारे संदेश मिळाला की सांगली येथील टाटा कंपनीचा डंपर (MH 50 N 4299) हा चोरी झाला आहे आणि तांत्रिक विश्लेषणात चोरीचा डंपर दौंड हद्दीतून जात असल्याचे समजते आहे. त्यामुळे दौंड पोलिसांनी बीट मार्शल व वाहतूक विभाग अंमलदार यांना माहिती देऊन शहरात नाकाबंदी करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान सदरचा चोरीचा डंपर दौंड- नगर रस्त्यावरील नगर मोरी चौकात आला असता नाकाबंदीवरील पोलीस पथकाने तो अडवून पकडला.
डंपर ताब्यात घेत असताना चालकाने डंपर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र नकाबंदी साठी नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करीत त्याच्या मुस्क्या आवळल्या. चोरट्याला पोलीस खाक्या दाखविताच त्याने डंपर चोरी करून आणल्याचे कबूल केले. दौंड पोलिसांनी याबाबतची माहिती कडेगाव पोलीस स्टेशनला कळविली. चोरीच्या डंपरसह चालकाला पुढील तपासासाठी कडेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया दौंड पोलिसांनी केली आहे. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस फौजदार सुरेश चौधरी, रमेश साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, करमचंद बंडगर यांच्या पथकाने वरिल कामगिरी बजावली आहे.