दौंड : तू एक साधा कॉन्स्टेबल आहे, तुझी काय लायकी आहे मला माहित आहे अशी डायलॉग बाजी करीत पोलिसांना अरेरावीची भाषा वापरणाऱ्या युवका विरोधात दौंड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करीत अटक केली.
शहरातील डॉ. आंबेडकर चौकामध्ये पोलिसांच्या नाका-बंदी दरम्यान घटना घडली. अवधूत ज्ञानदेव राऊत (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) असे अटक आरोपीचे नाव आहे.
दौंड पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायं.6 वा. दरम्यान येथील आंबेडकर चौकामध्ये दौंड पोलीस नाका-बंदी करीत असताना एक चारचाकी वाहनातून (MH 16,BH 959) दोन युवक विना मास्क प्रवास करताना दिसले, त्यात वाहन चालक मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्याने गस्तीवरील पोलिसाने गाडी थांबवून त्यांना विचारणा केली. त्यावर चालकाने, मास्क लावायची गरज नाही, मी माझ्या गाडीत आहे, मी मास्क लावणार नाही तुला काय करावयाचे ते कर अशी अरेरावीची भाषा पोलिसांना वापरली.
तसेच गाडीतून उतरत पोलिसांच्या अंगावर धावून आला व धक्काबुक्की करीत त्याने पोलिसांना शिवीगाळही केली. एवढ्यावरच न थांबता तू काय आमचा बाप झाला काय, तुझे मी ऐकायला असे म्हणत आरडाओरडा करीत त्याने सरकारी कामात अडथळा आणला. पोलीस कॉन्स्टेबल अक्षय घोडके यांच्या फिर्यादीवरून अवधूत राऊत विरोधात भा.द. वि.353,332,504,506 कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक राठोड, पो. उपनिरीक्षक गोसावी, पालवे,पो. कर्मचारी शिंदे, जाधव ,थोरात, राऊत, झाडबुके,वाकळे, वाघ, गायकवाड या पथकाने कारवाई केली.