दौंड पोलिसांनी केली गावठी दारूभट्टी उध्वस्त|दारू भट्टी मालक अटकेत | शहर व परिसरातील अवैध धंद्यांचा समूळ नायनाट करणार- पो.नि. संतोष डोके

अख्तर काझी

दौंड : दौंड तालुक्यातील बोरीबेल गावात गावठी दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करून दारूभट्टी उध्वस्त केली. याप्रकरणी दौंड पोलिसांनी मनोज उर्फ मन्या हिरामण चव्हाण(रा. बोरिबल, दौंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पो. निरीक्षक संतोष डोके यांना बातमी दारामार्फत खबर मिळाली की, मनोज चव्हाण हा बोरीबेल गावच्या हद्दीतील खळदकर वस्ती परिसरात हातभट्टीची दारू बनवून त्याची विक्री करीत आहे. त्यामुळे पो. निरीक्षक संतोष डोके, पो. उपनिरीक्षक शहाजी गोसावी, सहा. पो. उपनिरीक्षक संतोष शिंदे ,पो. हवा. महेंद्र लोहार या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य(कीं. रु.23 हजार 500) मिळाले. पथकाने सर्व रसायन व साहित्य जागीच नष्ट केले. दारू भट्टी मालकावर भा. द. वि. कलम 328 सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ख),(ग) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पुणे जि. ग्रामीणचे पो. अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पो. अधीक्षक संजय जाधव, दौंडचे उपविभागीय पो. अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शहर व परिसरातील असणाऱ्या अवैध धंद्यांवर अशाच प्रकारे कारवाईचे सत्र सुरू राहणार असून अवैध धंद्यांचा समूळ नायनाट करणार असल्याचा इशारा पो. निरीक्षक संतोष डोके यांनी दिला आहे.