|सहकारनामा|
दौंड : (अख्तर काझी)
दौंड पाटस रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारा मालवाहतुकीचा टेम्पो भगीरथी नाल्याच्या पुलावरून थेट खाली पाण्यात कोसळल्याची घटना घडली आहे. दौंड पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सुदैवाने टेम्पो चालक (सिराज शेख, कुरकुंभ) हा थोडक्यात बचावला आहे. घटना स्थळावरील उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पाटस रस्त्यावरून मालवाहतूक करणारा मोकळा टेम्पो(MH 45-0329, फिरंगाई ट्रान्सपोर्ट असो.) भरधाव वेगात पाटस हुन कुरकुंभ ला चालला होता, वाहन चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील भागीरथी नाल्याच्या कठड्यावरून टेम्पो थेट खाली पाण्यात कोसळला.
दोनच दिवसापूर्वी या नाल्या मधील पाणी पुढे सोडल्याने आज नाल्यात पाणी कमी होते त्यामुळे सुदैवाने टेम्पो व चालक पाण्यात बुडाले नाहीत. टेम्पो पुलावरून खाली पडल्याचे दिसताच बघ्यांची गर्दी जमली, दरम्यान अपघाताची खबर जवळच असलेल्या दौंड पोलीस स्टेशन च्या वाहतूक विभागातील पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार सुरेश चौधरी, पो. कर्मचारी अमजद शेख,अक्षय घोडके,विशाल जावळे आणि तीन होमगार्ड यांनी घटनास्थळावर धाव घेतली तेव्हा पाण्यात अर्धवट बुडालेल्या टेम्पोच्या चालकाच्या केबिन मधून चालक पोलिसांना, मला वाचवा, मला जगायचे आहे असे ओरडून सांगत होता.
पोलिसांनी त्याला धीर देत आम्ही आलो आहोत तुला आता काहीही होणार नाही असा धीर दिला. व लागलीच टेम्पो बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविला. टेम्पो पाण्यातून थोडा वर घेत आधी घाबरलेल्या चालकाला बाहेर काढले. थोडेसे खरचटणे सोडून चालकाला कोणतीच मोठी दुखापत झालेली नव्हती. पोलिसांनी अपघाताची खबर टेम्पो मालकाला दिली आणि चालकाला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात पाठविले.
योगायोगाने अपघातानंतर याच रस्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याकडे जात होते त्यांनी या पुलावर थांबून पोलिसांकडून अपघात कसा झाला याची माहिती घेतली.