|सहकारनामा|
दौंड : (अख्तर काझी)
शहरातील प्रमुख रस्त्यांवर, मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर नागरिक आपली वाहने दुतर्फा लावत असल्यामुळे या रस्त्यावरून चालणेही अवघड होत आहे. त्यामुळे शहरातील वाहने पार्किंगचा विषय ऐरणीवर आला आहे. दौंड शहरातील प्रमुख रस्त्याच्या काॅक्रेटीकरणासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून हे रस्ते तयार करण्यात आले आहेत.
मात्र, जिथे नवीन रस्ते झाले आहे, तिथे रस्त्यावर दुतर्फा असंख्य दुचाक्या, चार चाकी वाहने पार्किंग केल्या जात असल्यामुळे हे रस्ते आहेत कि पार्किंगचे ठिकाण असा प्रश्न पडत आहे. आत्तापर्यंत पार्किंगची सोय करण्यासंदर्भात अपयशी ठरलेल्या दौंड नगरपरिषदेने आत्तातरी झोपेच्या सोंगातून बाहेर पडण्याची गरज आहे. भविष्यात पार्किंगीची व्यवस्था केली नाहीतर शहरातून पायी चालणे देखील मुश्किल होईल अशी अवस्था झाली आहे.
कुरकुंभ मोरी, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, यादरम्यान २ कोटी २७ लाख रूपये खर्चाचे रस्ते करण्यात आले आहे. तसेच हुतात्मा चौक ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, इथपर्यंत १ कोटी ४६ लाख रूपये रस्त्यावर खर्च केला जात आहे. येथील नियोजनशून्य कारभारामुळे सुमारे ३ कोटी ७३ लाख रुपये खर्चाचे रस्त्यावर वाहने पार्किंग करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्यामुळे वारंवार वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत असून नागरिकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शहराचा विस्तार व वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामानाने वाहतुकीसाठी सर्वच रस्ते अपुरे पडत आहे. या मुख्य रस्त्यालगत शाळा, बॅका, सोसायट्या, दौंड नगरपरिषद, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, अशी विविध शासकीय कार्यालय असून दुकाने, बाजारपेठ असल्याने येथे कायम वर्दळ असते. शहरात येणाय्रांना वाहने पार्किंग करण्याची सोय नसल्याने नाईलाजाने ती रस्त्यावर लावावी लागत आहे.
दौंड नगरपरिषदेच्या अस्तित्वापासून येथे पार्किंगची बोंब कायम आहे. दौंड पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दौंड नगरपरिषद पार्किंगचे नियोजन करणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती. रस्त्यावर केल्या जाणाय्रा पार्किंगमुळे रस्ते अरूंद होत आहे. एकावेळी दोन वाहने जाताना कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात नगरपरिषदेतील राजकीय गटांनी समन्वय साधून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पार्किंगचा विषय मार्गी लावण्या संदर्भाचा प्रस्ताव मंजूरही झाला आहे, प्रत्यक्षात मात्र काम का होत नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे.