अख्तर काझी
दौंड : महागडी कबुतरे चोरणाऱ्या कबूतर टोळीला पुणे जिल्हा ग्रामीण विभागाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. कबूतर चोर टोळी कडून 35 महागडी (रेसर) कबुतरे हस्तगत करण्यात आली आहेत. दादासो हरिदास चव्हाण, नागेश मारुती पवार (दोघे राहणार, साळूका वस्ती, खुटबाव, दौंड), सोमनाथ ज्ञानेश्वर खोमणे(रा. नाझरे सुपे, ता. पुरंदर, जिल्हा पुणे), यश बाळाराम चव्हाण (रा.जवळा अर्जुन, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि.5 जानेवारी रोजी, चोरमले वस्तीवरील (गोपाळवाडी) पाळीव प्राणी विक्रेते सुजित शिंदे यांच्या दुकानातून चोरट्यांनी महागडी कबुतरे चोरून नेली होती, शिंदे यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. दरम्यान दि. 24 जानेवारी रोजी खबरी कडून माहिती मिळाली की, चोरमले वस्ती कबूतर चोरी प्रकरणातील कबुतरे खुटबाव येथील दादासो चव्हाण याच्याकडे असून त्याने त्याच्या साथीदारांसह ही चोरी केली असल्याची पक्की माहिती मिळाली.
सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना कळविण्यात येऊन, त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस पथकाने दादासो चव्हाण यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने साथीदारासह सदरची चोरी केली असल्याचे कबूल केले. तांत्रिक बाबींच्या अभ्यासावरून इतर आरोपींनाही अटक करण्यात आली व त्यांच्याकडील 35 कबुतरे हस्तगत करण्यात आली.