दौंड मध्ये आलमगीर मशिदीच्या जागेवर अतिक्रमण करण्यास विरोध करणाऱ्या मशिदीच्या विश्वस्ताला मारहाण, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

अख्तर काझी

दौंड : शहरातील ऐतिहासिक शाही आलमगीर मशिदीच्या इनामी जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मशिदीच्या विश्वस्ताला तिघांनी मारहाण केल्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी मशिदीचे विश्वस्त ताज गफूर इनामदार, मुलाणी,(रा. विठ्ठल मंदिराच्या मागे, गांधी चौक दौंड) यांनी फिर्याद दिली. पेत्रस स्टीवन केडगावकर, मीना पेत्रस केडगावकर व शमो पेत्रस केडगावकर (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, दौंड )अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना 30 डिसेंबर रोजी डिफेन्स कॉलनी परिसरामध्ये घडली. फिर्यादी डिफेन्स कॉलनी परिसरात आपल्या ताब्यात असलेल्या आलमगीर मशिदीच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी पेत्रस केडगावकर हे फिर्यादी यांच्या जागेतील खोली समोरचे पत्रे तोडून बांधकाम करीत होते. त्यामुळे फिर्यादी यांनी आपल्या मोबाईल मध्ये त्या बांधकामाचे फोटो काढण्यास सुरुवात केली असता, पेत्रस केडगावकर, मीना केडगावकर यांनी फिर्यादी यांना दगडाने मारहाण केली. तसेच शमो केडगावकर याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण केली.

इनामदार यांना मारहाण होत असताना एका मध्यस्थाने भांडणे सोडविली. यावेळी फिर्यादी यांच्या दुचाकीचेही नुकसान करण्यात आले व त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
शहरातील शाही आलमगीर मशीदीची देखभाल व दिवाबत्ती करण्यासाठी येथील इनामदार कुटुंबीयांना इनामी जमिनी देण्यात आलेल्या आहेत. या जमिनींवर अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून इनामदार कुटुंबीय वेळोवेळी जागेची पाहणी करण्यासाठी जात असतात.

असे असतानाही मशिदीच्या जागेमध्ये अतिक्रमणे होतच आहेत. मशिदीच्या जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणाला विश्वस्त ताज इनामदार यांनी विरोध केल्यानेच त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आलमगीर मशिदीच्या इनामी जागा हडपण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समाजातील कथित ठेकेदारांनी या विषयाकडे सुद्धा गांभीर्याने पाहून आलमगीर मशिदीच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत अशा प्रतिक्रिया समाजातून येत आहे.