अख्तर काझी
दौंड : महावितरण वीज कंपनी शहरात कामाच्या नावाखाली सतत अघोषित भार नियमन लादत आहे ज्यामुळे येथील सामान्य नागरिक व व्यापारी वर्ग या परिस्थितीला अक्षरशः वैतागले आहेत. महावितरण च्या या मनमानी व भोंगळ कारभाराविरोधात दौंड शहर काँग्रेसने शहरातून आक्रोश मोर्चा काढून निषेध नोंदविला.
काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष हरेष ओझा, तन्मय पवार, अतुल थोरात, रजाक शेख, अतुल जगदाळे, विठ्ठल शिपलकर, श्रेयश मुनोत आदि पदाधिकारी मोर्चा मध्ये सहभागी होते. पक्षाच्यावतीने महावितरणचे अभियंता यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
शहरात सततचा होणारा विजेचा लपंडाव बंद व्हावा, वीज दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची निकृष्टता तपासून उच्च व शासनमान्य दर्जाचे साहित्य वापरण्यात यावे, शहरातील एखाद्या भागात वीज समस्या निर्माण झाल्यास इतर भागातील वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांची प्रत्येक भागात जोडणी व्हावी ,शहरातील वीज समस्या व उपाय निवारण्यासाठी स्थानिक नागरिक व अधिकारी वर्गाची एक समिती स्थापन करून दर महिन्याला समितीची बैठक घेण्यात यावी.आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
मागण्यांबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा दौंड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पुन्हा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.