|सहकारनामा|
दौंड : (अख्तर काझी)
दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक मार्ग रस्त्याचे काम सध्या सुरू आहे परंतु काम पुन्हा रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भिमनगर दरम्यान चा रस्ता 11 मीटर चाच करण्यात यावा व या रस्त्यालगत अडथळा ठरणाऱ्या खाजगी जागा काढूनच रस्ता करण्यात यावा तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू नये अशी भूमिका दौंडकर नागरिकांनी घेतल्याने हा वाद चिघळत जाणार असे दिसते आहे.
सध्या या रस्त्याचे काम सुरू असून रस्ता 7 मीटरचाच होत आहे हे लक्षात आल्याने दौंडकर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या नागरिकांनी आज मुख्याधिकारी यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन दिले, निवेदनात असे नमूद केले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भिमनगर दरम्यानचे रस्त्याचे काम आराखड्यातील रुंदी नुसार होणार नाही असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सदरचा रस्ता शहरातील मुख्य रस्ता असून मोठ्या रहदारीचा सुद्धा आहे. अष्टविनायक गणपती मधील प्रमुख तीर्थक्षेत्र सिद्धटेक, करमाळा, कर्जत येथे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो. तसेच या रस्त्यावर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालये आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात येथूनच वर्दळ असते. काही महिन्यापूर्वी या अरुंद रस्त्यामुळे एका निष्पाप विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे.
तसेच वाहनांचे अपघातही या ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे या मुख्य रस्त्याबाबत दौंड करांच्या भावना तीव्र असून सदरचा रस्ता आराखड्यातील रुंदी नुसारच करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी विक्रम पवार, संजय जाधव, श्यामसुंदर सोनोने, मधुकर जठार, नगरसेवक राजेश गायकवाड,सचिन कुलथे, अविनाश गाठे, रामेश्वर मंत्री, सुनील औटे, नवनाथ सोनवणे, सुनील व्हँकाडे, बाळू ननवरे, रवी बंड, सुनील राऊत आदी उपस्थित होते.
याविषयी मुख्याधिकारी म्हणाल्या की,रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या खाजगी जागा काढण्या कामी दौंड पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केलेली आहे त्याची पूर्तता होताच पोलीस बंदोबस्तात अडथळे काढण्याचे काम करणार आहे.
या रस्त्यालगत असलेल्या ज्यांच्या खाजगी जागा या रस्त्या कामात जात आहेत त्यांच्याशी बातचीत केली असता त्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, रस्ता रुंद करण्यासाठी जर आमच्या खाजगी जागा प्रशासन पाडणार असेल तर आमच्या जागेचा मोबदला प्रशासनाने आम्हाला आधी द्यावा मगच बांधकाम पाडावे. शहरातील कोणतेही विकास काम विना अडथळा पार पडतच नाही असा दौंड शहराचा इतिहास झाला आहे अशी प्रतिक्रिया सामान्य दौंडकर देत आहेत.