दौंड : दौंड तालुक्यातील चौफुला येथे परवा ओबीसी बहुजन पार्टीची प्रचार सभा झाली. या सभेत ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी विविध नेत्यांवर टिका करताना दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावरही थोडीफार टिका केली होती. मात्र ही टिका केवळ दिखाऊपणा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. या मागे आमचे आणि त्यांचे जमत नाही असे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.
दौंड तालुक्यातून आमदार राहुल कुल गटाच्या ओबीसी, बहुजन आणि विविध जाती धर्मातील कार्यकर्त्यांचा महेश भागवत यांना पाठिंबा मिळत असल्याची चर्चा सर्वत्र रंगत होती त्यामुळे आम्ही आणि आमदार राहुल कुल गट हे राजकीय विरोधक आहोत, आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही केवळ हे दाखविण्यासाठी परवा झालेल्या सभेमध्ये आ. कुल यांच्यावर टिका करण्यात आली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांना मिळालेली उमेदवारी आणि झालेली गर्दी ही अनेकांना भुवया उंचावणारी ठरत आहे. महेश भागवत यांच्या सभेला माजी आमदार रमेश थोरात तसेच विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या ओबीसी बहुजन समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर याचा वेगळा संदेश जाऊ नये म्हणून आ. कुल यांच्यावर टिका करण्यात येऊन त्या गटाचा आणि आमचा काही एक संबंध नसल्याचे भासविण्यात आल्याची चर्चा होत आहे.
नेते एक झाले तरी कार्यकर्ते एक होतील याची शाश्वती नाही.. माजी आमदार रमेश थोरात हे अजित पवार यांचे खंदे समर्थक असून विद्यमान आमदार राहुल कुल हे भाजपचे आमदार आहेत. या दोघांनीही महायुतीने दिलेला उमेदवार निवडून आणू असे या पूर्वीच जाहीर केले आहे. मात्र मागील 20 वर्षांचा इतिहास पाहता दोन्ही गटातील कार्यकर्ते हे बारामतीच्या दोन्ही पवारांवर नाराज असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत. 2009 ला रमेश थोरात हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते त्यावेळी राहुल कुल हे राष्ट्रवादी च्या चिन्हावर निवडणूक लढवत होते तर विद्यमान आमदार राहुल कुल हे 2014 साली रासप आणि 2019 साली भाजप च्या चिन्हावर निवडून आले त्यावेळी माजी आमदार रमेश थोरात हे राष्ट्रवादी च्या चिन्हावर निवडणूक लढले होते. त्यामुळे वेळोवेळी राष्ट्रवादीला या तालुक्यातील जनतेने नाकारल्याचा इतिहास असल्याने नेत्यांनी आवाहन केले तरी कार्यकर्ते मात्र त्यांचे किती ऐकतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.