भिडेंना दौंड शहरात येण्यास विरोध करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल ! दौंड पोलिसांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अन्यथा बेमुदत उपोषण

दौंड : संभाजी भिडे यांना दौंड शहरात येऊ देऊ नये म्हणून येथील दलित संघटनांनी व पक्षांनी रस्त्यावर उतरून विरोध केल्याने दौंड पोलीस प्रशासनाने त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. दौंड पोलिसांच्या या भूमिकेचा येथील सर्व दलित संघटनांनी व पक्ष पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला आहे.

आंबेडकरी चळवळ चिरडण्याच्या हेतूने दलित पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप करीत पोलीस अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत दौंड पोलीस स्टेशन समोर उपोषणाचा इशारा दलित संघटनाच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे. या संघटनांकडून दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्याकडे निषेधाचे व मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे अमित सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे अश्विन वाघमारे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सागर उबाळे, राजेश मंथने तसेच सर्वच दलित संघटनेचे व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, दि.16 जानेवारी रोजी संभाजी भिडे यांना दौंड शहरातील काही जातीयवादी वृत्तीच्या लोकांनी दौंडमध्ये बोलावून शहराची शांतता भंग करण्याचे व येथील जातीय सलोखा बिघडविण्याचे काम करीत असल्याचे निवेदन दौंड पोलिसांना देण्यात आले होते. संभाजी भिडे यांना दौंडमध्ये सभा घेण्यास व येण्यास मनाई करावी अशी मागणी पोलिसांकडे यावेळी करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी दलित कार्यकर्त्यांनाच अरेरावीची भाषा वापरून, तडीपारीच्या ऑर्डर काढू, गुन्हे दाखल करू असे धमकाविले व संभाजी भिडे यांचा कार्यक्रम घेणाऱ्यांना मात्र मनाई केली नाही. पोलिस द्वेष भावनेतून काम करीत असल्याचे जाणवीत आहे. संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर मात्र कायदेशीर गुन्हे दाखल केलेले नाहीत. व आंबेडकर अनुयायांवर मात्र खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत असा आरोप या संघटनांकडून केला जात आहे. चुकीच्या व द्वेष भावनेतून कायदेशीर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर व भिडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजक व संबंधित कार्यकर्ते यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा 20 जानेवारी रोजी समस्त भीम अनुयायी दौंड पोलीस स्टेशन समोरच आमरण उपोषणास बसणार आहेत असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

दौंड पोलीस स्टेशन जाणून बुजून आंबेडकरी चळवळ संपविण्याचे काम करीत असून दलित समाजातील पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आम्ही आंदोलन करणार असल्याचे अमित सोनवणे यांनी सांगितले. दलित पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे पोलिसांनी मागे घ्यावेत अशी मागणी ही अमित सोनवणे यांनी केली आहे.