दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन चा गैर फायदा घेत पुणे- सोलापूर महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या 5 अटल दरोडे खोरांवर दौंड पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे. पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या आदेशाने सदरची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दौंड चे पो.नि. सुनील महाडिक यांनी दिली आहे.
देवगन अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण( दोघे रा. बोरावके नगर,दौंड), अक्षय कोंडक्या चव्हाण(रा. माळवाडी, लिंगाळी), नेपश्या पिराजी काळे(रा. राक्षस वाडी,कर्जत,नगर), विधी संघर्ष बालक सुरज भोसले(रा. गोपाळवाडी, दौंड) अशी मोका अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पो.नि. सुनील महाडिक यांनी या कारवाई बाबत दिलेली अधिकची माहिती अशी की, मार्च महिन्यामध्ये संपूर्ण देशावर कोरोना महामारी चे संकट होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा लॉक डाउन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्वच महामार्ग निर्मनुष्य होते, अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. महा मारीला घाबरून पुणे, मुंबई शहरातील लोक रात्रीच्या वेळेस पुणे- सोलापूर महामार्गाने कुटुंबासह मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जात होते. याच परिस्थितीचा फायदा घेत या महामार्गावरील पाटस ते भिगवण हद्दीमध्ये दरोडेखोरांची ची एक टोळी सक्रिय झाली होती. या दरोडेखोरांनी या मार्गाने जाणाऱ्या लोकांना मारहाण करीत लुटमार सुरू केली. तसेच आवश्यक सेवेतील मालवाहू वाहनांना सुद्धा आडवून त्यावरील चालकांना जबर मारहाण करीत त्यांना लुटले जात होते. परंतु हे दरोडेखोर पोलिसांना मात्र सापडत नव्हते. त्यामुळे या ठिकाणच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता. अशातच एक दिवस या टोळीने सोलापूर हुन पुण्याकडे धान्य घेऊन जाणाऱ्या वाहनावरील ट्रकचालकास जबर मारहाण करीत तीक्ष्ण हत्याराने भो कसले, त्यात त्याचा मृत्यू झाला. दरोडेखोरांनी त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज लुटून नेला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व दरोडेखोरांना जेरबंद करण्याच्या सूचना केल्या. मग मात्र दौंड पोलिसांनी तपासाला कमालीची गती दिली, व अत्यंत नियोजन पद्धतीने तपासाची चक्र फिरवीत, गोपनीय माहिती गोळा करीत आरोपींची नावे निष्पन्न केली व त्यांना बेड्या ठोकल्या. या आरोपींना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून दरोड्यातील मुद्देमाल व हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत. सदरचे आरोपी संघटित गुन्हेगारी करीत असल्याने त्यांच्यावर दौंड पोलिसांनी यापूर्वीच तडीपारीची कारवाई केलेली होती. याच आरोपींनी यापूर्वी सुद्धा कर्जत, श्रीगोंदा, दौंड भागातही अनेक दरोडे घातलेले निष्पन्न झाल्याने दौंड पोलिसांनी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्र चे महानिरिक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला. आणि मंजुरीनंतर या आरोपींना मोका लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महाडिक यांनी दिली आहे.
मोका कारवाई नंतर सदर आरोपी येरवडा कारागृहातून पळून गेले होते, त्यापैकी दोघांना दौंड पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे, मात्र अद्यापही अक्षय चव्हाण व नेपश्या काळे हे फरारीच आहेत. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पो. अधीक्षक संदीप पाटील, पो. अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पो. अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शना खाली व सहा. पो.अधीक्षक ऐश्वर्या शर्मा, पो. उपअधीक्षक गजानन टोम्पे यांच्या नेतृत्वा खाली पो. निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पो.निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पो. ना. सचिन बोराडे, सहाय्यक फौजदार भाकरे, पो. शि. नारायण वलेकर या पथकाचा कारवाईत सहभाग होता.