दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव येथे पुन्हा एकदा स्फोटकांच्या सहाय्याने इंडिया वन कंपनीचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांकडून हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्याची दुसरी वेळ असून यावेळीही तीच पद्धत अवलंबवली गेली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दि.4 मे रोजी पारगाव येथील इंडिया वन कंपनीचे एटीएम स्फोटके लावून उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र नागरिकांची चाहूल लागल्याने अज्ञात चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. तसाच प्रकार दि. 26 जुलै रोजी रात्री 1:30 ते 2:00 वाजण्याच्या सुमारास घडला असून यावेळीही त्याच प्रमाणे एटीएम ला स्फोटके लावून ते फोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याबाबत किशोर निंबाळकर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र यावेळीही लोकांची चाहूल लागल्याने तीन अज्ञात चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा यशस्वी झाले आहेत. या अगोदर राज्याच्या विविध भागांमध्ये एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी वेगवेगळी शक्कल लढविल्याचे पाहण्यात आले होते ज्यामध्ये जेसीबी मशिनच्या सहाय्याने एटीएम फोडणे, स्कॉर्पिओ गाडीला दोरी च्या सहाय्याने एटीएम मशीन बांधून ते तोडून घेऊन जाणे, तसेच तलवार, हत्यारांच्या सहाय्याने एटीएम फोडण्याच्या घटना घडल्यानंतर आता स्फोटकांच्या सहाय्याने एटीएम फोडून त्यातील पैसे चोरण्याचा नवीन फंडा चोरट्यांनी शोधून काढल्याचे दिसत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कापरे करीत आहेत.