दौंड : दौंड तालुक्यातील कोरेगांव भिवर येथे लफडयाच्या किरकोळ कारणावरून एकावर चाकू ने सपासप वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील आरोपी देविदास फडतरे याचे कोरेगाव भिवर गांवच्या हद्दीमध्ये मारूती मंदीराचे जवळ अभिषेक नांवाचे हॉटेलचे आहे. या हॉटेल समोर आरोपी देविदास विनायक फडतरे हा फिर्यादी अविनाश भानुदास फंड (वय 28, रा. कोरेगाव भिवर, ता. दौंड) यांचा भाऊ सुखदेव याच्या पाठीमागे दगड घेवून लागलेने त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी हे त्याच्या हॉटेल समोर गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपीला तु कशाला विनाकारण भावासोबत भांडणे करतो, त्याला का शिव्या देतो, तु माझे भावाचे लफडे बघीतले आहे काय, तुझे कडे काय पुरावा आहे काय, अशी विचारणा करत असतानाच आरोपी याने फिर्यादिस तु तुझ्या भावाची बाजु लावुन धरतो काय, मला खोट ठरवतोय काय, थांब आता तुझ्याकडे बघतोच, तुला मारूनच टाकतो असे म्हणून त्याने त्याचे हॉटेल मधून धारधार चाकु आणून धारधार चाकुने फिर्यादी यांच्या डोक्यावर, मानेवर उजवे बाजुस सपासप वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचा भाऊ सुखदेव हा सोडविण्यासाठी आला असता त्याचे डावे हाताचे पंज्यावर व उजवे हाताचे करंगळी वर चाकुने वार करून दुखापत करण्यात आली.
या सर्व घटनेनंतर फिर्यादी यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि लोखंडे हे करीत आहेत.