दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
आज दौंड शहरांमध्ये पाच जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, दुर्दैवाची बाब म्हणजे एका दहा महिन्याच्या बाळाला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील ५१ जणांचा अहवाल आज प्राप्त झाला त्यापैकी ५ जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये पंचशील टॉकीज परिसरातील दोन,गांधी चौकातील दोन तर भिमनगर परिसरातील एकाचा समावेश आहे.करोना चा संसर्ग शहरात तोच वाढतच चालला आहे आतातरी दौंड करांनी सावध व्हा जबाबदारीने वागा असे सांगण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. फक्त शहरातील व्यापारपेठ बंद ठेवून चालणार नाही तर लॉक डाऊन मधील प्रशासनाने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे आता तरी खूप गरजेचे झाले आहे. फक्त पैशाच्या मागे न धावता आपल्या इच्छा,छंदांना आवर घालून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या ५६ वर पोहोचली असताना नागरिकांनी अधिक काळजीने वागले पाहिजे.
महामारी च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी एका बाधित व्यक्ती मागे किमान 15 संपर्क शोधणे आवश्यक असताना शहरात हे प्रमाण 10 पेक्षा कमी दिसत आहे त्यामुळे संसर्ग वाढण्यास पोषक वातावरण शहरात रोज तयार होत आहे. तसेच काही संताप जनक घटनाही याला कारणीभूत ठरत आहे. शहरातील एका ज्येष्ठ महिलेचे नुकतेच निधन झाले होते त्यांच्यावर नित्य नियमाप्रमाणे अंत्यसंस्कारही करण्यात आले. अंत्ययात्रेत जवळपास२०-२५ लोक उपस्थित होते आणि नंतर असे कळाले की मृत महिला ही करोना बाधित होती. खाजगी प्रयोग शाळेत चाचणी केल्याने ही माहिती नगरपालिकेला समजली नाही. अशा घटना शहरात पुन्हा घडणार नाहीत याची प्रशासनाने दखल घेणे आवश्यक झाले आहे.