दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोरोनाने दौंड करांना चांगला दिलासा दिला आहे. मागील तीन दिवसांत शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली होती परंतु आज शहरातील एकही संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही ही दौंड करांसाठी समाधानाची बाब आहे.
उपजिल्हा रुग्णालयाने दिनांक 20 ऑगस्ट रोजी शहर व परिसरातील 62 संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते, त्याचा अहवाल दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला. अहवालानुसार 62 पैकी 57 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ग्रामीण भागातील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 15 ते 50 वयोगटातील 5 पुरुषांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सरपंच वस्ती-1, देऊळगाव राजे-1, नानविज प्रशिक्षण केंद्र-1 तसेच रा रा पो गट-5 मधील 2 रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली.
आज गणपती बाप्पांचे सर्वत्र आगमन होणार आहे, त्यामुळे शहरात मोठी वर्दळ असणार आहे. परंतु सध्या सर्वच उत्सवांवर कोरोनाचे सावट आहे त्यामुळे दौंड करांनी सतर्क राहूनच लाडक्या बाप्पांचे स्वागत करणे आवश्यक आहे. बाप्पांच्या आगमनामुळे कोरोना चे आता लवकरच विसर्जन होणार अशी दौंड करान कडून अपेक्षा व्यक्त होत आहे.