‘दौंड प्रांत’ कार्यालयाची उद्घाटन ‘कार्यक्रम पत्रिका’ आणि ‘कोनशीलेवरून’ वाद उफाळला ! हा दुजाभाव चालणार नाही, कोनशीला बदला : वैशाली नागवडे

दौंड : दौंड प्रांत कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेवरून आता चांगलाच वाद उफाळून आला आहे. दौंड प्रांत कार्यालयाच्या उद्घाटनाची प्रोटोकॉल प्रमाणे काढण्यात आलेली शासकीय कार्यक्रम पत्रिका एक आणि प्रांत कार्यालयाची उद्घाटन कोनशीला मात्र वेगळीच असल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा गट) नेत्या वैशाली नागवडे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. प्रोटोकॉल प्रमाणे जी कार्यक्रम पत्रिका होती तीच कोनशीला असावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि सध्याची कोनशीला त्वरीत बदलावी अन्यथा यासाठी आंदोलन केले जाईल असा ईशारा वैशाली नागवडे यांनी दिला आहे.

शासकीय कार्यक्रम पत्रिका

काय आहे प्रकरण, वैशाली नागवडे यांची माहिती दौंड प्रांत आणि दौंड तहसीलदार यांच्याकडून प्रोटोकॉल प्रमाणे दौंड प्रांत कार्यालयाच्या उद्घाटनाची कार्यक्रम पत्रिका काढण्यात आली होती. ती विविध मान्यवरांना पाठविण्यात आली होती. त्यामध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नावांसह खा. सुप्रिया सुळे आणि अन्य मान्यवरांची नावे छापण्यात आली होती. मात्र उद्घाटन कार्यक्रम पार पडला आणि उद्घाटनाची कोनशीला मात्र वेगळीच असल्याने सर्वजण अवाक झाले. या कोनशीलेवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे नावच नव्हते तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचेही नाव टाकण्यात आले नाही. जर त्यांना कोनशीलेवर नावे टाकायची नव्हती तर मग कार्यक्रम पत्रिकेत तरी नावे टाकण्याचा बनाव का करण्यात आला असा सवाल वैशाली नागवडे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत दौंड प्रांत मिनाज मुल्ला हे इलेक्शन ट्रेनिंग कार्यक्रमात असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही तर दौंड तहसीलदार यांनी याबाबत दौंड प्रांत यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकते असे सांगितले.
दौंड प्रांत कार्यालयाच्या कोनशीलेवरून दौंड तालुक्यातील अजितदादा गटामध्ये नाराजी पसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे वर सरकार जरी एक असले तरी खाली मात्र काही ना काही खटके उडताना दिसत आहेत. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असेही बोलले जात आहे.