अख्तर काझी
दौंड : दौंड शहराच्या मुख्य रस्त्यांवर व बाजारपेठेत सध्या भटक्या जनावरांनी व मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. याचा प्रचंड त्रास दौंड च्या नागरिकांना सोसावा लागत आहे. मोकाट व भटक्या जनावरांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी बसपा ने केली आहे.
मोकाट जनावरे व बेवारस कुत्री मोठ्या संख्येने शहरातील प्रत्येक रस्त्यांवर व चौकांमध्ये भटकत आहेत. जनावरे व कुत्री टोळक्याने रस्त्यांवरच ठाण मांडून बसत असल्याने शहरात वाहतुकीला अडथळा होत आहे. मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या व भटकी जनावरे रस्त्यातच थांबत असल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच घरी जावे लागत आहे.
मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेस रस्त्याने जाणाऱ्या वाहनांच्या मागे लागतात, हल्ला करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अनेक दुचाकी चालकांचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटते व त्यांचे अपघात होत आहेत. पिसाळलेला कुत्रा चावल्याने शहरातील एका मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नगरपालिकेने या जनावरांचा, कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.