राजकीय वार्तापत्र
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होताना दिसत आहे. या दोन्ही उमेदवारांनी पवार घराण्यात असताना अनेक वर्षे एकत्रित सत्ता भोगली आहे. एकदुसऱ्याच्या विरोधात असणारे काका, पुतणे सध्या एक दुसऱ्याचे भर सभेत वाभाडे काढत आहेत. तुम्ही काय केले आणि आम्ही काय केले यामध्ये जनता मात्र हुशार झाली आहे. एकदुसऱ्यासोबत एकत्र असणारे त्यावेळी एकदुसऱ्यावर स्तुतीसूमने उधळत होती आणि आता मात्र एकदुसऱ्याचे कांड बाहेर काढत असल्याने या दोन्ही उमेदवारांना एकाच नाण्याच्या दोन बाजू समजणारी जनता यावेळी समर्थ तिसरा पर्याय असलेले ओबीसी बहुजन पार्टीचे लोकसभा उमेदवार महेश भागवत यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे.
राजकीय जानकारांच्या माहितीनुसार सध्या दोघात तिसरा पर्याय म्हणून ओबीसी बहुजन पार्टीचे महेश भागवत हे सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या बरोबरीने मते घेऊ शकतात असा अंदाज व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही पवारांना कायम विरोध करणारे यावेळी महेश भागवत यांच्यामागे उभे राहत असल्याची परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे सुळे, पवार यांच्या बरोबरीने भागवत हे आपले स्थान टिकवतील आणि बाजी मारतील असा विश्वास महेश भागवत यांचे समर्थक व्यक्त करताना दिसत आहेत.
पवारांना वाढता विरोध, विरोधकाला वाढती पसंती – बारामती लोकसभा मतदार संघ हा कायम पवारांचा अभेद्य गड म्हणून ओळखला जातो. मात्र या गडाला सुरुंग लावण्याचे काम हे महादेव जानकर यांनी 2014 साली केले होते. त्यामुळे 2014 नंतर पवारांच्या उमेदवाराला प्रचंड असा विरोध वाढला हे नाकारून चालणार नाही. 2014 साली सुप्रिया सुळे आणि महादेव जानकर यांच्यामध्ये झालेल्या निवडणुकीत अवघ्या सत्तर हजार मतांच्या फरकाने महादेव जानकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी अजित पवार, शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय हे सुप्रिया सुळे यांचा एकत्रित प्रचार करत होते. तसेच त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती ही भक्कम होती.
यावेळी 2024 ला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस फुटून त्या मध्ये दोन गट पडले आहेत. एक गट अजित पवार यांच्याबाजूने तर दुसरा गट हा शरद पवारांच्या बाजूने उभा राहिला आहे. एक गठ्ठा मतांची दोन ठिकाणी विभागणी झाल्याने तिसरा पर्याय म्हणून उदयास आलेल्या महेश भागवत यांना आता मैदान मारण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महेश भागवत यांचे चिन्ह ‘ट्रक’ तर सुप्रिया सुळे यांचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि सुनेत्रा पवार यांचे ‘घड्याळ’ अशी चिन्हे आहेत. यात महेश भागवत यांच्यामागे ओबीसी बहुजन समाजाची ताकद एकवटल्याचे दिसत आहे.
अजित पवार गट आणि सुप्रिया सुळे यांच्यामागे असणारा शरद पवार गट हा आपली मते दुभंगून बसला आहे तर मतांचे ध्रुवीकरण झाल्याने याचा सर्वात मोठा फायदा हा महेश भागवत यांना होताना दिसत आहे.
वर्तपत्राचा दुसरा भाग पुढील अंकात..