मुंबई : संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जागोजागी आंदोलने झाली. तरी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण करून सरकारला मराठा आरक्षणाविषयी विचार करायला भाग पाडले. एक महिन्याचा अल्टीमेटम संपत आल्याने आता शासकीय पातळीवरही मराठा आरक्षण संदर्भात हालचालिंना वेग आला असून याचाच एक भाग म्हणून आता छत्रपती संभाजी नगर या विभागाचा दौरा शासनाने नेमलेली समिती कारणार आहे. यावेळी ज्यांच्याकडे निजाम कालीन मराठा कुणबी दस्तावेज आहेत त्यांनी ते या समितीला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
11 ऑक्टोबर पासून समितीचा दौरा… मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य ११ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहेत.
नागरिकांना आवाहन… नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.