पुणे : निर्जनस्थळी महिलांना एकटे गाठून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
अशीच एक घटना दिनांक १५/०७/२०२५ रोजी दुपारी २:०० च्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ठाकुरसाई गावात घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक ३३ वर्षीय महिला रत्याने चालत जात असताना एका अनोळखी इसमाने दुचाकीवरून तिचा पाठलाग सुरु केला. त्याने या महिलेस रस्त्यात आडवून तिला रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगली भागात निर्जनस्थळी नेले. या ठिकाणी या नराधमाने तिच्या इच्छेविरूध्द बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण ठाकुरसाई हादरले होते. कोण, कुठून येईल आणि इज्जत लुटून जाईल या भीतीने महिला घराबाहेर निघायला घाबरत होत्या.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी गुन्ह्यातील आरोपीचा तात्काळ शोध घेणेबाबत आदेश दिल्यानंतर सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा घडला त्या घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार यांची तपास पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
यावेळी घटनास्थळाच्या परिसरातील सिसिटीव्ही कॅमेरे व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने सदर गुन्ह्यातील नराधम आरोपीस २४ तासाच्या आत ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीचे नाव बाळु दत्तू शिर्के (रा. जिवन नं.०१ ता. मावळ जि. पुणे) असे असून त्यास बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.