Breaking News : पारगाव जवळील भीमा नदी पात्रात ‘दोन’ तरुणांचे मृतदेह आढळले, नागरिकांना पुन्हा ‘त्या’ हत्याकांडाची आठवण

दौंड : पारगाव (सालूमालू ) ता. दौंड जवळील भीमा नदी पात्राच्या पुलाखाली नागरगाव (ता. शिरूर) हद्दीमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले असून यातील एका मृतदेहाची ओळख पटली आहे. मात्र दुसऱ्या मृतदेहाची ओळख अजूनही पटत नसल्याने या मृतदेहाचे गूढ वाढले आहे. या दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अजून समजू शकले नाही. मात्र यातील ओळख पटलेला एक मृतदेह हा मासे पकडणाऱ्या तरुणाचा असल्याची माहिती शिरूर पोलिसांकडून मिळाली आहे.

सात जणांची झाली होती हत्या.. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात सात जणांचे मृतदेह याच भीमा नदी पात्रात आढळून आले होते. या सात जणांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत होता मात्र त्यानंतर त्या सात जणांचे त्यांच्याच भावकीतील लोकांनी (चुलत भावांनी) खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला होता.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.. कालच दौंड शहराजवळील भीमा नदी पात्रात एक अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आज पुन्हा पारगाव-नागरगाव जवळील पुलाखाली दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने येथील वातावरण भीतीदायक बनले असून नागरिकांमध्ये या सततच्या घटनांमुळे भीती पसरल्याचे पहायला मिळत आहे. वरील घटनेचा तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप हे करीत आहेत.