दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे एक भयानक घटना घडली असून एका डॉक्टरने आपली पत्नी आणि आपल्या दोन मुलांना खून करून स्वतःही आत्महत्या केल्याचे पुढे येत आहे. अगोदर पत्नीचा खून करून नंतर दोन्ही मुलांना विहिरीत ढकलत स्वतःही आत्महत्या केल्याची ही घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ माजली असून अचानक समोर आलेल्या या घटनेने वरवंड मधील नागरिक मात्र सुन्न झाले आहेत.
अखेर त्या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश.. वडिलांकडून मुलांना ज्या विहिरीमध्ये ढकलून देण्यात आले त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने त्या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अखेर मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणेला यश आले.
आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२ ) असे असून पत्नीचे नाव पल्लवी दिवेकर (वय ३५) असे आहे. या दोघांचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत मिळून आले असून त्यांचा मुलगा अद्वित अतुल दिवेकर (वय ११ ) आणि मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर (वय ७ ) यांचे मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत.
मिळत असलेल्या माहितीनुसार डॉ.अतुल आणि त्यांच्या पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.