दौंड : बोरिबेल (ता.दौंड) गावामध्ये तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून दौंड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले असून 1 लाख 45 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राजेंद्र माणिक येवले, संजय दत्तात्रेय पाटोळे, पांडुरंग कुंडलिक खळदे, अनिल उमाजी जगताप, कांतीलाल रामा रणदिवे, अमोल भीमराव जगताप अशी जुगार खेळणाऱ्या 6 जणांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात मुंबई जुगार अधिनियम कलम 12 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे. दौंडचे पो नि. विनोद घुगे यांनी दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्या बाबतचे आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने सदरची कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार बोरीबेल गावच्या हद्दीत बोरीबेल -मलठण रस्त्यावरील राजवाडा वस्ती परिसरात तीन पत्ती जुगार अड्डा सुरु असल्याची खबर गुन्हे शोध पथकाचे पो. उप. निरीक्षक शहाजी गोसावी यांना खबऱ्या मार्फत मिळाली होती. गोसावी यांनी तत्काळ आपल्या पथकासहित या अड्ड्यावर धाड टाकीत जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पो.कर्मचारी सुभाष राऊत, अमोल गवळी, किरण राऊत, अमोल देवकाते यांच्या पथकाने सदरची कारवाई पार पाडली.