अख्तर काझी
दौंड : दौंड विधानसभेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे चुरशीची होणार असे दिसू लागले आहे. भाजपा व मित्रपक्ष (महायुती) ने विद्यमान आमदार राहुल कुल यांना पुन्हा उमेदवारी देऊन कूल यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. परंतु आ.राहुल कुल यांच्या विरोधात तुतारीचा नेमका उमेदवार कोण? याचे मात्र घोडे अडून बसले आहे. दौंड ची जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गेल्याने साहेब देतील तो उमेदवार आ.राहुल कुल यांच्याविरोधात लढणार हे निश्चित समजले जात आहे. मात्र सध्या तुतारी आम्हालाच मिळणार असे म्हणत अप्पासाहेब पवार गट आणि रमेश आप्पा थोरात या दोन गटांमध्ये स्टेटस वॉर चांगलेच रंगले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात तुतारीला अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे इतर मतदार संघाप्रमाणे दौंड मध्येही तुतारीची उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षामध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. तुतारी मिळाली की आपण अर्धी लढाई जिंकलो असे प्रत्येक इच्छुक उमेदवाराला वाटत आहे. म्हणूनच प्रत्येक इच्छुक उमेदवार मोठी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नक्की तुतारी मिळणार कोणाला याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार रमेश थोरात अजित पवार गटाला सोडून तुतारी मिळविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार व इतर 4 उमेदवार इच्छुक आहेतच. परंतु तुतारी मात्र रमेश थोरात किंवा आप्पासाहेब पवार यांनाच मिळणार हे सुद्धा जवळपास निश्चित असले तरी दोन्ही आप्पा वेटिंग वरच असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. कारण दोन्ही आप्पांपैकी तुतारी नेमकी कोणत्या अप्पाने वाजवायची हे खुद्द नामदार शरद पवार ठरविणार असल्याने दोन्ही आप्पांच्या कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला आहे. असे असले तरीही तुतारी आम्हालाच मिळाली आहे अशा संदेशाचे स्टेटस दोन्ही आप्पांचे कार्यकर्ते आपल्या मोबाईलवर रोज ठेवत असल्याने स्टेटस वॉर शिगेला पोहोचला आहे. या सर्व प्रकारामुळे दौंडकरांचे मनोरंजन होत असून विरोधक याची मजा घेत आहे.
ना.शरद पवारांचा पक्ष अडचणीत असताना अप्पासाहेब पवार पक्षाला व पवार साहेबांना सोडून गेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा जोमाने प्रचार केला. दौंड तालुक्यातून सुळे यांना 25 हजार मता पेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन देण्यात अप्पासाहेबांचा मोठा सहभाग होता हे साऱ्यांनीच पाहिले आहे. त्यामुळे पवार साहेब, सुप्रिया सुळे व पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या अप्पासाहेब पवारांनाच उमेदवारी दिली जावी व सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार व भाषणे करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. हीच भूमिका त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडली असल्याचे समजत आहे.
दुसरीकडे, तालुक्यात राहुल कुल यांना फक्त रमेश आप्पाच टक्कर देऊ शकतात हे मागील निवडणुकीत सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे विजयाच्या निकषावर पवार साहेबांनी तुतारी रमेश आप्पा यांनाच द्यावी असे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत. अशा परिस्थितीत ना. शरद पवार कोणत्या आप्पाला तुतारी सुपूर्द करतात याची संपूर्ण तालुक्याला उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या शहरात कोठेही फटाकडे वाजले की तुतारीचा उमेदवार फायनल झाला का? यावर चर्चा होताना दिसते. तुतारी तर आम्हीच वाजविणार असा दावा दोन्ही आप्पांचे कार्यकर्ते करीत आहेत. ज्यामुळे उत्सुकता अजूनच शिगेला पोहोचत आहे. शरद पवार साहेब, कधी व काय निर्णय घेतील याचे उत्तर मात्र कोणाकडे नाही.