दौंडच्या रस्त्यांवर अवतरले निळे वादळ, डॉ.भावना गायकवाड यांना न्याय मिळवून देण्यासाठी भीम जन आक्रोश आंदोलनास भीमसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अख्तर काझी

दौंड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांची नात डॉ. भावना गायकवाड (धुमाळ) यांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण करणारे त्यांचे पती डॉ. सदानंद धुमाळ व त्यांची सासू व दिर यांच्या विरोधात दौंड पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे डॉ. भावना गायकवाड यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दौंड मधील सर्व दलित संघटनांकडून आज दि. 21 ऑगस्ट रोजी भीमजन आक्रोश मोर्चा आंदोलन करण्यात आले.

शहरातील राजगृह बुद्ध विहार येथे त्रिशरण पंचशील पठण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. शहरातील सर्व राष्ट्रपुरुषांना पुष्पहार अर्पण करून दौंड पोलीस स्टेशन समोरील संविधान स्तंभ येथे मोर्चाची सांगता करण्यात आली. आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत दलित संघटनांचे पदाधिकारी व बहुसंख्येने भीमसैनिक सहभागी होते. यावेळी निषेध सभा घेण्यात आली. डॉ. सदानंद धुमाळ याचे शहरातील एका महिलेची अनैतिक संबंध आहेत, तिला घरी आणण्यासाठी डॉ. भावना या अडसर ठरत आहेत त्यामुळे ते डॉ.भावना यांच्या जीवावर उठले आहेत व त्यामुळेच ते त्यांच्यावर अन्याय अत्याचार करीत आहेत. त्यामुळे डॉ. सदानंद धुमाळ यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

डॉ. भावना गायकवाड यांनी त्यांच्यावर व मुलीवर त्यांचे पती सदानंद धुमाळ याने कशाप्रकारे अन्याय अत्याचार केले आहेत याची धक्कादायक माहिती कथन केली. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देण्यासाठी त्या पोलीस स्टेशनला आल्या असता पोलिसांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली व आरोपी सदानंद धुमाळ याला मात्र आदराची वागणूक दिली याचा त्यांनी निषेध नोंदविला.

दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून पोलिसांच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. निळ्या झेंड्याची ताकद आजमावू नका असे आव्हान त्यांनी पोलिसांना केले. हे प्रकरण म्हणजे फक्त डॉ. भावना यांच्याशी निगडित नसून संपूर्ण दलित समाजावर झालेला हा हल्ला आहे हे लक्षात घ्या असे त्यांनी समाजाला उद्देशून सांगितले. या प्रकरणामध्ये कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

डॉ. भावना गायकवाड यांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दलित संघटनांचे पदाधिकारी , भीमसैनिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.