सहकारनामा ऑनलाईन
: देशामध्ये लॉकडाउनची घोषणा होऊन आज नऊ दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह येत जनतेला संदेश दिला आहे. या संदेशामध्ये त्यांनी नऊ दिवसांमध्ये जनतेने हे दाखवून दिले की सामूहिक शक्तीने आपण एक होऊन करोनाविरुद्ध लढू शकतो असे म्हणत येत्या ५ एप्रिल रोजी एक उपक्रम सर्व देशवासीयांनी राबवायचा असून रात्री घरातील सर्व लाईट बंद करून घरातील दारामध्ये उभं राहून ९ मिनिटांसाठी दिवा, मेणबत्ती, किंवा मोबाईलची लाईट सुरू करायची आहे. त्यावेळी घरातील सर्व लाईट बंद करून सर्व घरात दिवा उजळेल असे केल्याने आपण एकाच ध्येयानं लढत आहोत हे सिद्ध होणार आहे असे सांगत या वेळी प्रत्येकानं आपल्या मनात आपण एकटे नाही आहोत असा संकल्प करावा असे मोदी यावेळी म्हणाले आहेत. पण लोकांनी हे कुठेही एकत्र बाहेर येऊन, एकत्रित जमून करू नये तर आपल्या घरामध्ये हे करावे असे आवर्जून सांगितले. लोकांच्या प्रति आदर व्यक्त करताना ज्या प्रकारे देशातील जनतेने सहकार्य केलं ते स्तुत्य असून अभूतपूर्व आहे. प्रशासकीय यंत्रणांनी या कठीण काळात चांगल्याप्रकारे सांभाळण्याचे काम केले आहे. मागील नऊ दिवसांपासून सर्वांनी करोनाविरुद्ध चांगला लढा दिला आहे आणि आता त्याची दखल सर्व देशांनी घेतली आहे. आपण लोकांनी संकट काळात एकीच्या शक्तीचं दर्शन घडवत देशावर संकट आले तर सर्वजण त्याविरुद्ध एक होऊन लढू शकतो हे आपण आता दाखवून दिलं आहे असं शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.