पूर्ववैमनस्यातून युवकावर सात जणांचा कोयत्याने हल्ला



लोणीकाळभोर : सहकारनामा ऑनलाईन

पूर्व वैमनस्यातून एका युवकाला धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले असून या प्रकरणी सात जणांविरुध्द लोणीकाळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोणीकाळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  थेऊर येथील चव्हाणवस्ती परिसरात एक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नितीन दत्तात्रय कुंजीर आपल्या दोन मात्रांसह गेले असता दोन अडीच वर्षापूर्वी घडलेल्या वादाचा संदर्भ घेत चव्हाणवस्ती येथील वर्कस चव्हाण, सुरेश चव्हाण, अनिल चव्हाण, ॠषीकेश चव्हाण, राजेश चव्हाण, निलेश शितोळे, अक्षय चव्हाण यांनी हातात कोयते घेऊन आले आणि नितीन कुंजीर यांस ‘तुला आता जीवंत ठेवणार नाही’ असे म्हणत वर्कस चव्हाण याने कोयत्याने डोक्यात वार केला त्यावेळी कुंजीर यांनी हाताने तो वार अडवल्याने हाताला मोठी जखम झाली तर अनिल चव्हाण याने डोक्यात केलेला वारही कुंजीर यांनी डाव्या हाताने अडवला असता अंगठ्याला जबर जखम झाली. यानंतर इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याची चाहूल लग्नातील माणसांना लागल्याने ते धावले त्यावेळी हे सर्व तेथून निघून गेले. नितीन कुंजीर यांना लोणीकाळभोर येथील एका खाजगी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे हे पुढील तपास करीत आहेत