दौंड : सहकारनामा ऑनलाइन
लग्नामध्ये नवरी मुलगी बुलेटवर, हेलिकॉप्टरमधून, वातानुकूलित आलिशान गाड्यातून किंवा बैलगाडीतून आल्याचे सर्वश्रुत होते, पण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करवलीने रिक्षाचे सारथ्य करत नवरीमुलीसह सर्व वऱ्हाड लग्न मंडपापर्यंत रिक्षाने नेल्याने या लग्नची चांगलीच चर्चा परिसरात होत आहे.
तर झाले असे दौंड तालुक्यातील बोरीपारधी या गावातील प्रकाश चव्हाण या रिक्षा चालकाच्या मुलीचा लग्न समारंभ नेमका जागतिक महिला दिनाच्या दिवशीच जुळून आला. मग काय जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून मोठ्या बहिणीच्या लग्नसमारंभात लहान बहिणीने स्वतः रिक्षाचे सारथ्य करून तिला मंगल कार्यालयापर्यंत घेऊन जाण्याचा उपक्रम हाती घेतला.
घरातील मंडळींनीही या उपक्रमाला साथदेत सर्व वऱ्हाडच रिक्षाने घेऊन जाण्याचे ठरवले आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्यातील स्त्रीशक्तीची ओळख करून देत या मुलीने आपल्या नवरीमुली बहिणीचे सारथ्य करत सुमारे पाच किलोमीटर रिक्षा चालवून हे वऱ्हाड लग्नमंडपापर्यंत आणले. मोठ्या आलिशान गाड्यांमधून येणारे वऱ्हाड अनेक रिक्षांनमधून येत असल्याचे पाहून लोकही कौतुकाने याकडे पाहत होते.