बँक, पतपेढी, वित्तीय संस्थांच्या कर्जवसुली एजंटांना आवरा : रिपब्लिकन सेना



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

विविध बँका, वित्तीय संस्था, पतपेढ्या, बचत गटांकडून अनेकांनी आपल्या अडचणीमुळे कर्ज घेतलेली आहेत. सध्याच्या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  व लॉक डाऊनमुळे अनेकांचे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. अशा कर्जदारांकडे संबंधित संस्थांनी कर्ज परतफेडीसाठी तगादा लावू नये व  कर्जफेडींच्या हप्त्यांमध्ये सरकारने दिलेल्या सुविधा व सवलतींचे पालन करावे या संदर्भातील आदेश तहसीलदारांनी संबंधित संस्थांना द्यावेत अशी मागणी रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन कामगार सेना, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग व जय मल्हार संघटना यांनी केली आहे. दौंड तहसील कार्यालय तसेच दौंड पोलीस स्टेशन यांना या  संदर्भात निवेदन देण्यात आले. समाजातील अनेक  लोकांनी आपल्या विविध गरजा भागविण्यासाठी बँका,पतपेढ्या,बचत गट, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे. लॉक डाऊन च्या  निर्णयामुळे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. याकामी रिझर्व बँकेने अशा कर्जदारांना कर्जाचे थकित हप्ते भरण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाने अशा कर्जांवरील व्याज रकमेवर ही सवलती दिलेल्या आहेत. परंतु संबंधित बँका व इतर संस्था कर्जदारकडे पैसे परतफेडीसाठी तगादा लावत आहेत, काही संस्थांचे वसुली करणारे एजंट गुंड प्रवृत्तीचे असून ते कर्जदारांना अर्वाच्य भाषेत दमदाटी करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी करोना ला सामोरे जायचे की कर्जफेडिला असा प्रश्न कर्जदारांना समोर आहे. शासनाने या  गोष्टीचा अत्यंत सहानुभूतीने विचार करून कर्जदारांना न्याय  द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे

….. अन्यथा आत्महत्या करावी लागेल—

करोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉक डाऊन मुळे खाजगी संस्था,कारखाने, दुकाने बंद होती. त्यामुळे लोकांच्या उत्पन्नाचे मार्ग बंद होते व आहेत. या कालावधीत स्वतःकडे शिल्लक असलेली रक्कम रोजच्या उदर निर्वाहासाठी वापरले गेली. त्यामुळे आता बाकी शून्य अशी परिस्थिती आहे. त्यातच लॉक डाऊन मुळे अनेकांच्या कामावर गदा आली आहे त्यामुळे कर्जाची परत फेड करायची कशी हा प्रश्न अनेकांना पडला आहे. शासनाने न्याय दिला नाही तर कर्जदारापुढे आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नाही अशी कैफियत निवेदनात नमूद आहे.

निवेदन देतेवेळी पक्षाचे पदाधिकारी आनंद बगाडे अनिल साळवे, मोहन सोनवणे,राजू गायकवाड, दीपक सोनवणे,विशाल माशाळकर आदी उपस्थित होते.